उस्मानाबाद :- तृतीयपंथी म्हणून समाजाच्या इतर वर्गाकडून नेहमीच उपेक्षा पदरी पडलेली. कायम उपहास, टीका, टक्केटोणपे कानी पडत ‘त्यां’चे जीवन सुरु असायचे. सर्वौच्च न्यायालयाच्या निर्णयाने आता हे चित्र पालटणार आहे. या तृतीयपंथियांना आता स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे. त्यांना मिळालेल्या याच हक्कांची जाणीव करुन देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यांच्या आत्मसन्मानाची नव्याने ओळख करुन देण्यासाठी!
        जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे, विधिज्ञ विशाल साखरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकर्ल्प संचालक रुपाली सातपुते आदींची उपस्थिती होती.
        तृतीयपंथीय म्हणून समाजातून वेगळे पडलेल्या या वर्गाला त्यांच्या हक्काची जाणीव करुन देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे जणू उपेक्षित वर्गाच्या माणूसकीची जाणीव निर्माण करणारा कार्यक्रम ठरला. तृतीयपंथीयांच्या वेदना त्यांच्याच शब्दात जाणून घेऊन शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांच्या वाट्याला आलेले दु:ख काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
      न्या. तावडे, जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि पोलीस प्रमुख पाटील या वक्त्यांनीही या कार्यशाळा आयोजनामागील उद्दिष्टाची विशेष दखल घेतली. या उपेक्षित वर्गाकडे उदरनिर्वाहाची साधने नाहीत. त्यामुळे विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी विशे, साह्य करण्याचे आवाहन डॉ. नारनवरे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला केले.
      न्यायालयाच्या निर्णयाने या वर्गाला आत्मसन्मान मिळणार असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी यांनी आरोग्य सुविधांची तर निर्मल भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी या अभियानाची माहिती दिली.
      तृतीयपंथीयांना त्यांच्या अधिकारांची जाणीव या निर्णयामुळे होईल, अशी अपेक्षा श्रीमती रावत यांनी व्यक्त केली. बचत गटाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेत असणा-या विविध योजनांच्या माध्यमातून या वर्गाला स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
       यावेळी उस्मानाबाद व तुळजापूर तसेच ग्रामीण भागातील तृतीयपंथी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यापैकी दोन-तीन जणांनी आपल्या भावनाही सर्वांसमोर मांडल्या.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती सातपुते व त्यांच्या सहका-यांनी सर्वांचे स्वागत केले.
 
Top