पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी परिसरात गत सात दिवसांपासुन जनावरांमध्ये सुरू असलेली अज्ञात आजाराची साथ आटोक्यात येण्‍यास तयार नसुन उक्कडगांव येथील जयराम केरबा सोनवणे या सामान्य शेतकयाच्या उरल्या सुरल्या शेवटच्या एका बैलालाही या साथीच्या आजाराची लक्षणे दिसुन येऊ लागली आहेत. बार्शीचे प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी एस.आर. कांबळे, आगळगांवचे पशुधन विकास अधिकारी डॉ. इक्बाल शेख, पांगरीचे सहाय्यक पशुधन अधिकारी चव्हाण आदींच्या पथकाने आज उक्कडगांव येथे भेट देऊन जनावरांची पाहणी करुन उद्या दि. 13 एप्रिल रोजी गावात लसीकरण मोहम राबवण्‍याचे निश्चित केले. आठवडयात पांगरी व उक्कडगांव येथील अनेक शेतक-यांची असख्य दुभती जनावरे मृत्युमुखी पडुन पशुपालकांचे आठ ते दहा लाख रूपयांचे पशुधन कमी होऊन त्याचा फटका पशुपालकांना बसला आहे.
    सात दिवसांपासुन उक्कडगाव व पांगरी परिसरात अज्ञात साथीच्या आजाराने थैमान घातलेले असताना याला आपण व आपले नशीबच जबाबदार असल्याचा विचार करून पशुपालकांनी धीर सोडला होता. मात्र एवढया मोठया संख्येनी पशुधन कमी होत असताना प्रशासनाचा याप्रकाराकडे कानाडोळा होत होता का असी चर्चा परिसरात सुरू आहे. उक्कडगावात लसीकरण करण्‍यात आले नसल्याचे पशुपालकांचे तर लसीकरण मोहिम यापुर्वीच राबवली असल्याचे पशुवैद्यकीय अधिका-यांचे म्हणणे आहे.
रक्ताचे नमुने प्रयोग शाळेत पाठवणे गरजेचे :-
    पाय अकडुन, मान तुटुन दोन-तीन दिवसात दगावणा-या व शेतक-यांना झटक्यावर झटके देणा-या जनावरांचे रक्त वरीष्ठ प्रयोगशाळेत पाठवुन त्याच्या अहवालावर उपचार पध्‍दती राबवल्यास निश्‍चीत फायदा होईल असे पशुपालकांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने पशुवैद्यकीय विभागाने पावले उचलणे गरजेचे आहे.
  अगोदरच गेल्या महिन्यात उक्कडगांव पांगरी, पांढरी, झानपुर, चिंचोली, ढेंबरेवाडी, घोळवेवाडी, शिराळे आदी डोंगरी पटयातील गावांमध्ये अभुतपुर्व गारपीठ होऊन त्यात शेतातील उभ्या पिकांचे अपरिमित नुकसान होऊन बळीराजाचे कंबरडेच बसले होते. त्या अस्मानी संकटातुन कसेबसे बाहेर पडण्‍याचा प्रयत्‍न करणा-या पशुपालक शेतक-यांना पुन्हा पशुधनाच्या मृत्यु प्रकरणाने पुरते भांबावुन सोडले आहे. आधीच चक्रात सापडलेल्या या भागातील पशुपालक शेतक-यांना साथीच्या आजाराने पुन्हा एकदा संकटात टाकण्‍यास सुरूवात केली आहे. गारपीठीच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या व येणा-या पैसावर स्वप्नांचे मनोरे बांधणा-या या भागातील पशुपालकांच्या नशीबी मात्र पुन्हा फटकाच आला आहे. सदर अज्ञात साथीचा आजार आतोक्यात येऊन पशुधन जगणे गरजेचे असुन त्यादृष्टीने संबंधीतांनी जलद पावले उचलणे गरजेचे आहे.
 
Top