कळंब (भिकाजी जाधव) -: गारपीटग्रस्‍तांना मदत म्‍हणून अवघे हेक्‍टरी साडे चार हजार म्‍हणजे एकरी सतराशे रुपयेची मदत जाहीर केली आहे. हे पैसे खते अन् कापसाच्‍या बी आणण्‍यासाठीदेखील पुरणार नाही. राजा उदार झाला अन् हाती मोठा लठ्ठ भोपळा हाती दिला, असे प्रतिपान विद्यमान खासदार तथा भाजपाचे नेते गोपानाथ मुंडे यांनी कळंब येथे आयोजित सभेत बोलताना व्‍यक्‍त केले.
 शुक्रवार दि. 4 एप्रिल रोजी कळंब येथे उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्‍या प्रचारार्थ आयोजित केलेल्‍या सभेमध्‍ये खा. गोपिनाथ मुंडे हे बोलत होते. पुढे बोलताना खा. मुंडे म्‍हणाले, भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीचे सरकार मे महिन्‍यात येणार आहे. हे सरकार आल्‍यानंतर शेतक-यांचे कर्ज माफ करुन त्‍यांचेकडील लाईट बील सुध्‍दा माफ केले जाईल, तसेच आमचं सरकार आल्‍यास आम्‍ही टोलमुक्‍त महाराष्‍ट्र करु, असे आश्‍वासनसुध्‍दा त्‍यांनी यावेळी केले. एल.बी.टी.ने व्‍यापारी उध्‍दवस्‍त झाला आहे. त्‍यामुळे एलबीटी कायदाही रद्द करणार असून ज्‍याप्रमाणे रेल्‍वेचे स्‍वतंत्र बजेट मांडले जाते, त्‍याप्रमाणेच महायुतीचे सरकार आल्‍यानंतर शेतक-यांसाठी वेगळं बजेट मांडणार असल्‍याचे खा. मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच त्‍यांनी सोलापरूच्‍या लोकांचे इकडे काय काम आहे, असे म्‍हणत अपक्ष उमेदवार रोहन देशमुख यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊ नये व बंडखोरी करणा-या रोहन देशमुख व त्‍यांच्‍यासो‍ब‍त फिरणा-या भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांना तात्‍काळ हकालपट्रटी करावे, असे यावेळी त्‍यांनी सांगितले. त्‍यानंतर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे यांनी रोहन देशमुख व त्‍यांच्‍या सहका-यांना आतापासून पक्षातून काढल्‍याचे जाहीर केले.
     खा. मुंडे यांनी महाराष्‍ट्राच्‍या आजी-माजी मुख्‍यमंत्रासह उपमुख्‍यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्‍यावर जोरदार टीका केली. देशात नरेंद्र तर उस्‍मानाबादेत रविंद्र अशी घोषणा देऊन प्रा. रविंद्र गायकवाड यांना निवडून देण्‍याचे आवाहन केले. तसेच महायुतीचं सरकार आल्‍यानंतर ओबीसीच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्‍याचे काम मी आणि उध्‍दव ठाकरे करणार असल्‍याचे यावेळी त्‍यांनी सांगितले.
          भाजपा, शिवसेना, रिपाइं, राष्‍ट्रीय समाज पक्ष, शेतकरी संघटना, शिवसंग्राम हे सहा पक्ष मिळून राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीला आता नक्‍की खाऊ, असे मुंडे म्हणाले. तसेच डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वय आता विश्रांती घेण्‍याचे वय असल्‍याचे सांगत ते कोणाचे ऐकत नसल्‍याने आता आपणच त्‍यांना घरी बसवले पाहिजे, असे म्‍हणाले. 
      यावेळी राष्‍ट्रवादी मागासवर्गीय विभागाचे प्रदेश उपाध्‍यक्ष धनंजय शिंगाडे यांनी भाजपामध्‍ये जाहीर प्रवेश केला. तर यावेळी बोलताना शिवसंग्राम संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष विनायक मेटे म्‍हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळवणं महत्‍त्‍वाचं वाटलं म्‍हणून आघाडीला लाथ मारुन मायुतीत सामील झालो आहे. अवघ्‍या साडेचार वर्षात 52 टक्‍के आरक्षण मुंडे यांनी ओबीसी समाजाला मिळवून दिले. तर आघाडीचे अनेक वर्षापासून सरकार असताना एकाही मुख्‍यमंत्री अथवा उपमुख्‍यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्‍याचं काम केलं नाही, असेही ते म्‍हणाले.
          या प्रचार सभेत महायुतीचे उमदेवार प्रा. रविंद गायकवाड, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्‍हाप्रमुख सुधीर पाटील, माजी जिल्‍हाप्रमुख भारत इंगळे, अॅड. मिलिंद पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष रविंद्र इंगळे, रा.स.प.चे आश्रूबा कोळेकर, रिपाइंचे राजाभाऊ ओव्‍हाळ, सेनेचे उपाध्‍यक्ष भारत सांगळे आदींची भाषणे झाली. याप्रसंगी माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील, दयानंद गायकवाड, कळंब तालुकाप्रमुख रामलिंग आव्‍हाड, अजित पिंगळे, दगडू धावारे, अॅड. खंडेराव चौरे, मिनाज शेख, दत्‍ता कुलकर्णी, सुधीर बनसोडे, रणजीत मस्‍के, उमेश कुलकर्णी यांच्‍यासह महायुतीचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
 
Top