उस्मानाबाद :- जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीसह विविध आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आणि आपत्तीपूर्व उपाययोजनेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असावे यासाठी आता जिल्हा प्रशासनाने गावोगावच्या विविध गणेश मंडळे, युवा मंडळे, जयंती उत्सव समित्या, प्रतिष्ठान यांच्या युवा कार्यकर्त्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर तात्काळ त्या-त्या ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने होणारी हानी टाळण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकारातून आता आपत्ती व्यवस्थापनासाठी या युवा शक्तीचा सकारात्मक उपयोग करुन घेतला जाणार आहे.
      येथील जिल्ह्याधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व नियोजनासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी ही संकल्पना मांडली  आणि त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीचे आदेश संबंधितांना दिले. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, चारही विभागांचे उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
      केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हे तर जिल्ह्यात अवर्षण, वीज कोसळणे, गारपीट, रस्त्यावरील अपघात, पावसाळ्यातील आजार, साथीचे रोग यासारख्या घटनाही घडतात. त्यामुळे यासंदर्भातील उपाययोजना केवळ शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यापुरत्या मर्यादीत राहून चालणार नाहीत, तर आपत्ती व्यवस्थापन आराखडा हा सर्वंकष आणि जिल्ह्यातील परिस्थिती विचारात घेऊन तयार केला गेला पाहिजे. त्यामुळेच अशा वेळी  जिल्ह्यातील ही युवा शक्ती निश्चित उपयोगी येऊ शकते, असे डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.
       प्रत्येक गाव-शहरातील युवा मंडळे, गणेश मंडळे यांची माहिती घेऊन त्या सभासदांची माहिती संकलित करा, असे निर्देश त्यांनी पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षास दिले. या सर्व मंडळांच्या तरुणांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करा. त्यांना परिपूर्ण प्रशिक्षण द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.
      विविध यंत्रणांनी त्यांचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सादर करावा. जिल्ह्यातील पाझर तलाव, साठवण तलाव यांची पाहणी संबंधित विभागाने करावी. पावसाळ्यात वीजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडतात. अशावेळी महावितरणने तात्काळ तेथे कार्यवाही करुन वीजपुरवठा सुरु करावा. पावसाळ्याच्या काळात महावितरणने स्वत:चा नियंत्रण कक्ष सुरु करावा, असे आदेश डॉ. नारनवरे यांनी दिले.
    आपत्ती येण्यापूर्वीच आपत्तीपूर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. विविध यंत्रणांनी त्यांना नेमून दिलेली कामे पार पाडावीत. प्रत्येक तालुक्यानेही यापुर्वी तेथे येऊन गेलेल्या आपत्तींचा अभ्यास करुन त्या प्रमाणे तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिले.  
 
Top