उस्मानाबाद :- सर्व नगरपालिकांनी वॉर्डनिहाय स्वच्छता आराखडा तयार करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व नगरपरिषदांना दिले आहेत.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी नगरपरिषदेशी संबधित विविध विषयांचा आढावा घेतला.
    नगरपरिषदांच्या आस्थापनेसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी आढावा घेतला. प्रत्येक नगरपालिकांनी त्यांच्या पदांबाबतच्या आकृतीबंधाचाआढावा घ्यावा. एकुण मंजूर पदे, पदभरती, रिक्त पदे, प्रशासकीय कामांची जबाबदारी आदींबाबत त्यांनी नगरपालिकांना सूचना दिल्या. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी कामांबाबत दैनंदिन आढावा घ्यावा. कामे न करणाऱ्यांची गय करु नये अथवा अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
    आर्थिक बाबींशी निगडीत विषयांवर निर्णय घेताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. कारण एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याची जबाबदारी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना टाळता येणार नाही, असे डॉ. नारनवरे यांनी स्पष्टपणे सुनावले.
    नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्यालयी राहिले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लावली  पाहिजेत. त्यादृष्टीने पावले उचला असे निर्देश त्यांनी दिले. कार्यालयीन कामकाजात बोकाळलेली  गैरशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
    नगरपालिका क्षेत्रात विकासासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांची मदत घ्या. नगरपालिका क्षेत्रात अतिक्रमण वाढणार नाही, याबाबत दक्षता घ्या, असेही डॉ. नारनवरे यांनी यावेळी सांगितले.
    प्रत्येक नगरपरिषदांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण केली पाहिजे. प्रत्येक वॉर्डनिहाय संबंधित वॉर्ड नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून दैनंदिन आढावा घेण्यासंदर्भातही त्यांनी सांगितले. ओला-सुका कचरा वेगळा करणे, जैव कचरा विलगीकरण आदि विषयांवर लक्ष देण्याची सूचनाही यावेळी डॉ. नारनवरे यांनी केली.
    या बैठकीस उस्मानाबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेविता बनसोडे, तुळजापूरच्या नगराध्यक्षा विद्या गंगणे यांच्यासह उमरगा, भूम, परंडा, मुरुम, कळंब येथील नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी उपस्थित होते.       
 
Top