बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: व्हॉटस्‌अप या सोशल साईटवरुन भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांची बदनामी करणारे छायाचित्र पाठविल्याप्रकरणी बार्शी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
     शिवसेना शहरप्रमुख दिपक आंधळकर यांच्या मोबाईलवर व्हॉटस्‌अप या सोशल साईटवरुन सदरचे छायाचित्र आल्यानंतर याबाबत त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी दि.३ रोजी दुपारी चारच्या दरम्यान सौंदरे येथील एका पेट्रोलपंपाजवळ आल्यावर आंधळकर यांच्या मोबाईलवर लव इज ग्रेट या ग्रुपवरुन सदरचे छायाचित्र पाठविण्यात आले होते. सदरच्या छायाचित्रात नरेंद्र मोदी हे कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पायाजवळ वाकून पाया पडत असल्यासाराखे दाखविण्यात आले आहे. ज्या क्रमांकावरुऩ सदरचा मजकूर प्रसिध्द झाला तो उमेश अक्कलकोटे यांचा मोबाईल क्रमांक असल्याचे तसेच यश कुंकूलोळ हे या ग्रुपचे चालक असल्याचे प्राथमिक पोलिस तपासात दिसून आले आहे. आंधळकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन बार्शी पोलिसांत माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कायदा २००० चे कलम ६६ अ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सालार चाऊस हे करीत आहेत.
 
Top