कळंब -: उस्मानाबाद मतदार संघातील कर्मचा-यांना राज्यातील इतर लोकसभा मतदार संघाच्या तुलनेत अल्प प्रमाणात मानधन मिळाल्याने 'अधिकारी तुपाशी तर कर्मचारी उपाशी' असा प्रकार झाल्याने निवडणुक कर्मचा-यांमध्ये नाराजीचा सूर एेकावयास मिळत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून इतर जिल्ह्याप्रमाणे मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणुकीच्या कामासाठी जवळपास सहा हजार कर्मचारी कार्यरत होते. त्यात केंद्रप्रमुख, सहाय्यक केेंद्रप्रमुख व निवडणुक अधिकारी 1 व 2 अशी 4 कर्मचा-यांची एक टीम तयार करण्यात आली होती. या कर्मचा-यांना दोन दिवस प्रशिक्षण तर तीन दिवस प्रत्यक्ष मतदानासाठी त्यांचा वेळ घेण्यात आला होता. या पाच दिवसाचे मानधन या कर्मचा-यांना अल्पप्रमाणात दिल्याने कर्मचा-यांत नाराजीचा सूर निघत आहे.
तुळजापूर येथील सहाय्यक निवडणुक अधिका-यांनी तर कहरच केला आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचा-यांना घेऊन जाताना मोफत बसची सोय करण्यात आली होती. पण निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर परत आपल्या तालुक्यात जाण्यासाठी त्यांच्याकडून बसचे परतीचे भाडे घेण्यात आले. याबाबत येथे दि. 17 एप्रिल रोजी रात्री सहाय्यक निवडणुक अधिकारी व कर्मचा-यांत बाचाबाची झाली. त्यावेळी शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळाकृष्ण तांबारे यांनी जिल्हाधिका-यांना दुरध्वनीद्वारे प्रकार सांगितल्यावर त्या कर्मचा-यांना मोफत बसची सोय करण्यात आली.
याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिका-यांना निवेदन देवून इतर जिल्ह्याप्रमाणे मानधन देण्याची विनंती केली आहे. या निवेदनावर प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष एल.बी. पडवळ, सोमनाथ टकले, अशोक जाधव, भक्तराज दिवाणे, प्रदीप मदने, संतोष देशपांडे, सुरेश वाघमोडे, मनोज चौधरी यांच्या स्वाक्ष-या आहेत.