बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- पूर्व वैमनस्यातून खून झालेल्या विठ्ठल उर्फ इच्चप्पा मारुती पवार याचे वीस मारेकरी घटनेनंतर फरार झाले. त्यातील तीन आरोपींना सापळा रचून अटक करण्यात बार्शी पोलिसांना यश मिळाले असून पुढील आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी दिली.
       शिवाजी आण्णा पवार (वय २३), शंकर उर्फ बाबा सुभाष पवार (वय २५), सुनिल अशोक पवार (वय ३०) सर्व रा.इंदिरानगर, वैराग असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. वैराग (ता.बार्शी) येथे शनिवारी सकाळी सदरचा खुनाचा प्रकार घडला होता. जखमी विठ्ठल पवार याला उपचारासाठी सोलापूर येथे नेत असतांना त्याचा मृत्यू झाल्यानंतर वैराग येथे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने जाळपोळ, तोडफोड करुन संताप व्यक्त केला होता. परिस्थिती हाताळण्यात वैराग पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नाईक यांना अपयश आल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. यातील आरोपी हे बार्शीत नातेवाईकांकडे असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवस शोधाशोध केली. पोलिस अधिक्षक मकरंद रानडे, अप्पर पोलिस अधिक्षक लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली. पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकातील पोलिस कर्मचारी मुन्ना बाबर, अमोल घोळवे, राजू नाईकवाडी, प्रकाश कोष्टी यांना तलवडा पोलिस स्टेशन हद्दीतील राजेगाव, बीड जिल्ह्यातील माजलगाव परिसरात आरोपी बोलेरो गाडीतून फिरत असल्याचा सुगावा लागला. मिळालेल्या माहीतीवरुन त्यांनी बोलेरो वाहन क्र. एम.एच.१२- १२३३ या वाहनाचा पाठलाग करुन तिघांना अटक केली आहे.
 
Top