बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य घेऊन वाटचाल करत असलेल्या एस.टी. महामंडळातील बार्शी आगारास सन २०१३-१४ मधील चांगल्या कामगिरीमुळे विभागात प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी आगारप्रमुख एस.एम.कदम यांनी दिली. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक एम.बी.जुनेरी, क.सहा.बाळकृष्ण बागल, वातूक नियंत्रक जयसिंग परदेशी, लेखाकार मंदार सावंत, योगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
    कदम म्हणाले, चांगल्या प्रशासकिय कौशल्य, पर्यवेक्षकीय कर्मचार्‍यांचा सहभाग, कामाची पध्दत, कार्यशैली, कामगारांची सेवा यामुळे हा क्रमांक देण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सोलापूर विभागाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. नव्याने सुरु करण्यात आलेल्या बसच्या फेर्‍यांमध्ये दुपारी एक वाजता अक्कलकोट, सकाळी साडेनऊची विजापूर, सकाळी सव्वान्यी माणकेश्वरमार्गे भूम, शनिवार रविवारी दुपारी सव्वाचारची उमरगा यांनाचांगला प्रतिसाद आहे. खास उन्हाळ्याकरिता शेगाव, नांदेड, पुणे, संभाजीनगर (औ.बाद), शिर्डी आदी फेर्‍या वाढविण्यात येणार आहेत. यात्राकाळासाठी येरमाळा, शिखर शिंगणापूर आदी ठिकाणी जादा वाहनांची सोय करण्यात येत आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर दि.१६ ते १७ पर्यंत २८ वाहनांची मागणी आहे त्याची पूर्तता करण्यात येईल. रेल्वे स्थानकावर जाण्या-येण्यासाठी दररोज सकाळी चांगला प्रतिसाद आहे. वैराग येथे मिडीबसची सोय करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या अडचणी असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे तरीदेखिल चांगल्या सेवा देत असतांना उत्पन्नवाढ करण्यातसाठी विभागात प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. यापुढील काळात आणखी चांगल्या प्रकारचे काम करुन राज्यात प्रथम येण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
 
Top