उस्मानाबाद -: जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्‍ये फळबागा, पिके मोठ्याप्रमाणवर उद्धवस्त झाली आहेत. या नैराश्येतून अनेकांनी आत्महत्ये केल्‍या.  याबाबतचे वृत्त वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांवर पाहूण मन हेलावल्याने पिंपरी-चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्त्या भारती अरविंद मार्डे यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. यामध्ये त्यांनी बँकेतील 3 लाख रुपयांची ठेव मोडून आत्महत्याग्रस्त 30 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत केल्याने त्यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    गेल्या दोन महिन्यांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांसह, फळबागा, द्राक्षबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. याबाबतची माहिती प्रसार माध्यमातून पाहिल्यानंतर शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय भारती मार्डे यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवलेली तीन लाख रुपयांची रक्कम शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बहीण सुशीला पाडाळे, लहू गायकवाड, वैभव गायकवाड यशवंत काळे, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली. तेथे त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची यादी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनीही ज्यांना अद्याप मदत पोहचली नाही अशांना मदत करण्याबाबत सुचविले. त्यानंतर मार्डे आपल्या नातेवाइकांसह शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी रवाना झाल्या. त्यांनी प्रथम तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथील म्हाळू चाफे या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या घरी जाऊन 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी म्हाळू चाफे यांच्या आई सरूबाई चाफे, चुलते संबाहार चाफे, चुलती पार्वती चाफे, बहीण हौसाबाई तांबे आदींची उपस्थिती होती. शेतकर्‍यांचे दु:ख पाहून हळहळ व्यक्त करणारे हजारो असतात. परंतु, पिंपरी चिंचवड या 250 किलोमीटर दूरवरून उस्मानाबाद जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी मार्डे यांनी घेतलेला पुढाकार इतरांसाठी आदर्शवत आहे.
 
Top