आजच्या मुलींचं नेमकं चाललंय काय? लग्न होणा-या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, घरकामांबद्दलची नावड असं काहीही असलं, तरी त्यावर मोकळेपणानं बोलायला हवं. आजची तरुणी उच्चशिक्षित, कमावती, महत्त्वाकांक्षी अन्‌ स्मार्ट आहे. पण लग्नाच्या मुद्‌द्‌यावर काहीतरी बिनसतंय. यावरून नेत्राची गोष्ट ऐकण्यासारखी आहे.
    नेत्रा एमबीए असून चांगल्या आयटी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करते. 29 वर्षांच्या नेत्राचं व तिच्या आई-वडिलांचं तिच्यासाठी वरसंशोधन सुरू आहे चार वर्षांपासून. दोन वर्षांपूर्वी तिचा एकदा साखरपुडा झाला, त्यानंतर विवाह तिनेच मोडला. आई-वडिलांनी तिच्या कलाने घेतले. "जबरदस्ती नको, होऊ दे तिच्या मनानं' म्हणून जड अंतःकरणानं लग्न मोडलं.
    आता तीन महिन्यांपूर्वी एका उपवर मुलाशी लग्न जुळलंय. त्या निर्णयापर्यंत यायला ती त्याला तीन महिन्यांत अनेक वेळा भेटली. घरचेही भेटले. लग्न ठरल्याचं व साखरपुड्याची तारीख दोन्ही कुटुंबांनी मिळून ठरवली आणि पुन्हा नेत्राचं येरे माझ्या मागल्या. या मुलात पण बरेच दोष काढून लग्न मोडायचं म्हणून हटून बसली आहे. त्यानंतर आई-वडील समुपदेशनाला घेऊन आले.
    अनामिकाची गोष्ट त्याहून वेगळी. तिचं वैभवशी, बघून- पसंत करून व्यवस्थित लग्न झालं. दोन्हीकडचे सर्व खूष. कारण हे दोघेही उच्चशिक्षित. आयटीत नोकरीला, दिसायला अनुरूप. पण अनामिका आपल्या लग्नापूर्वीच्या बॉय फ्रेंडला लग्नानंतर काही दिवसांतच नियमित भेटू लागली. गोष्टी ब-याच थरापर्यंत गेल्यावर, तिच्या नवऱ्याला, वैभवला कळलं. मग त्यांनी त्या दोघांना पकडलं. हे सर्व लग्नाला महिना व्हायच्या आत झालं. त्यानंतर हताश झालेला वैभव समुपदेशनाला आला.
    हे काय चाललंय आजच्या मुलींचं? इतका गोंधळ का बरं चालला आहे? आई-वडील संस्कार करतात, पण पुढचा स्वतःचा विकास स्वतःला करावा लागतो, त्यावरून त्यांना कुठे थांबावं हे कळत नाही का? समजा लग्न होणाऱ्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, घरकामांबद्दलची नावड असं काहीही असलं, तरी त्यावर मोकळेपणानं बोलायला हवं. साधारणपणे आजचे पालक सर्व समजून घेतात, मार्ग सुचवतात, उपायांवर चर्चा करतात. समुदपेशकाकडेही नेतात. पण मुळात आपल्याला आपला प्रश्‍न काय आहे ते कळतं का? मुली स्वतः स्वतःचं आयुष्य का कठीण करतात? मी नोकरी करते, पैसे कमावते म्हणून मला सर्व समजले, असे वाटणाऱ्या मुली घरात आई-वडील आजारी पडल्यास ब-याचदा व्यवस्थित स्वयंपाक करून त्यांना जेवू घालू शकत नाहीत. नेत्राच्या बाबतीतही तिचे वडील तिला म्हणाले, ""तुला हे लग्न करायचं नाही, तर मी ते स्वीकारतो; पण या पुढं तू वेगळं घर घेऊन रहा. त्यानंतर लग्न कर वा नको करू, तुझं आयुष्य तूच बघ. कारण आम्हाला आता मानसिक त्रास सहन होत नाही...'' पण नेत्रात स्वतंत्र राहण्याचा आत्मविश्‍वास वा धमक मुळीच दिसली नाही. म्हणजे पैसे मिळवण्यापलीकडे माझ्यातले गुण-अवगुण मला माहीत नाहीत आणि मी दुसऱ्याचे गुण-अवगुण बघून त्याला पास-नापास करतेय.
    त्यामुळे स्वतःला लग्नासाठी तयार करण्याकरिता स्वतःचे गुण-दोष, मी कोण आहे, माझ्या आवडी-निवडी, मी कुठल्या मुद्‌द्‌यांवर जुळवून घेऊ शकते, कौटुंबिक पार्श्‍वभूमी आदी विविध मुद्दे मला माहीत करून घ्यायला हवेत, त्यानंतरच आपण लग्नाला तयार करू शकतो आणि जोडीदाराच्या अपेक्षांबद्दल विचार करू शकतो.


- समाधान फुगारे
मंगळवेढा
 
Top