पांगरी (गणेश गोडसे) -: गत दोन-तीन वर्षात पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्यांनाही मोठया प्रमाणात बसला असुन यावर्षी फळांचा राजा आंबा खुपच भाव खाण्‍याची चिन्हे आहेत. गत दोन वर्षांपासुन पांगरी परिसरात अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे आंब्याची जुनी झाडे कशी तरी तग धरूण आहेत मात्र पान्‍याची पुरेपुर गरज पुर्ण होत नसल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. तसेच पाण्यामुळे या भागातील अनेक वर्षांचे जुने वृक्ष वाळुन जावु लागलेले आहे.
    आंब्याच्या झाडांना पाणी नसल्यामुळे मुळात मोहोर, तौर खुपच कमी प्रमाणात बाहेर पडला होता. त्यातच बहुतांश तौर हा वारे अयोग्य वातावरण विविध किडीचा प्रादुर्भाव यामुळे झडुन गेला. उर्वरित मोहोराला कांही प्रमाणात आंबे लागले असुन तेही वादळ वा-यांपुढे किती दिवस टिकाव धरणार अशी शंका शेतक-यांना आहे. पांगरी परिसरात यावर्षी जवळपास 60 टक्के आंब्यांच्या झाडांना तौरच आला नाही, अशी परिस्थती आहे. ज्या झाडांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा झाला अशांना मात्र भरभरून आंबे लागल्याचे चित्र आहेत. पांगरी परिसरात डोंगर भागात आंब्याचे जुने वृक्ष असल्यामुळे ब-यापैकी उत्पन्न मिळत असते. मात्र यावर्षी आंबा ऊत्पादक शेतक-यांच्याही पदरी घोर निराशाच पडणार आहे. यंदा पांगरी परिसरातील गावरान आंब्याच्या उत्पादनात मोठी घट असल्यामुळे फळांच्या राजांचा दर भरमसाठ वाढण्‍याची चिन्हे असुन गोरगरिबांना याची चव चाखायला मिळेल की नाही याबाबत सर्वसामान्यांमधुन शंका व्यक्त केली जात आहे. तसेच भीषण दुष्काळामुळे व पाणीटंचाईमुळे या भागातील आंबराई व नवीन संकरीत केसर गोटी आदी आंब्याची झाडेही संकटात आली आहेत. अनेक वर्षे जिवापाड व कष्‍टाने सांभाळलेली आंब्याची झाडे या उन्हाळयात टिकाव धरतील का हा मोठा प्रश्‍न या भागतील आंबा उत्पादक शेतक-यांसमोर आ वासुन आहे.
 
Top