पांगरी (गणेश गोडसे) :- चिखर्डे (ता. बार्शी) परिसरात आज सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजण्‍याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला असुन नारी शिवारात वीज पडुन औदुंबर भिमराव मुळे या शेतक-याचा बैल मृत्युमुखी पडला आहे. साडेसहा वाजण्‍याच्या सुमारासही पुन्हा पावसाने सुरूवात केली होती. शेतक-यांच्या शेतातील गहु, हरभरा, भाजीपाला यासह ज्वारीचा कडबा, पेंडया पावसामुळे नुकसानग्रस्त झाल्या आहेत.
    बार्शी तालुक्याच्या पुर्व भागासह डोंगरी पटयात अवकाळी पावसाची व नुकसानीची मालिका सुरूच असुन अवकाळी पाऊस कांही केल्या थांबण्‍याचे नांवच घेताना दिसत नाही. चिखर्डे शिवारातील येळंब, नारी, खामगांव, मळेगांव आदी लगतच्या गावात पाच वाजण्‍याच्या सुमारास अचानक वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरूवात झाली. नुकतेच कारी, गुंजेवाडी, कौडगांव, अंबेजवळगे, भानसगांव, आदी भागात तुफान गारपीठ व पाऊस होऊन ऊस, आंबा यासह भाजीपाल्याचे तुफान नुकसान झाले होते. ही घटना ताजीच आहे. बळीराजा त्यातुन कसेबसे मार्ग काढण्‍याच्या प्रयत्नात असतानाच आज पुन्हा याच भागात वादळी वा-यासह विजेच्या गडगडाटात अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. वादळी वा-यामुळे या भागात अनेक वृक्ष उलथुन पडले आहेत. तर लिंबु, आंबा, मोसंबी आदी फळबागंच्या झाडांनाही वादळी वा-याची हानी पोहचुन फळांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या सुरू असलेल्या सततच्या हजेरीमुळे या भागातील आंब्यांची झाडे आंबा विरहीत झाली आहेत. अवकाळी पाऊस कांही केल्या शेतक-यांची पाठच सोडण्‍यास तयार नाही. आज सोमवारी दुपारपासुनच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. अचानक वादळी वा-यासह पावसाला प्रारंभ झाला. शेतक-यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका सहन करावा लागत आहे. आधीच दुष्काळच्या छायेत सापडलेल्या शेतक-यांचे अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. पांगरी परिसरात शेतक-यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
 
Top