उस्मानाबाद :  40- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूकीत सहकारी संस्था, सहकारी बॅंका, पतसंस्था तसेच पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या संस्था यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा  निवडणूक यंत्रणेने जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात नुकतीच बैठक घेऊन या संदर्भातील निर्देश दिले होते.
       सध्या लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर सध्या यंत्रणेचे लक्ष आहे. एक लाखाहून अधिक पैसे खातेदारांच्या खात्यातून काढले गेल्यास त्या व्यवहाराची माहिती यंत्रणेकडून घेतली जात आहे. आता सहकारी बॅंक, सहकारी संस्था, पतसंस्था तसेच बॅंकाशिवाय पैशाची देवाण करणाऱ्या संस्था यांच्या आर्थिक व्यवहारांवर ही समिती लक्ष ठेवणार आहे.  या संस्थांच्या व्यवहारामुळे मतदारास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होणार नाही, याकडे या समितीचे लक्ष राहणार आहे.  
       या समितीत जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी बी. आर. दुपारगुडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक डॉ. रुपाली सातपुते, जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजिनाथ खांडके हे सदस्य असतील. लेखाधिकारी (शिक्षण) डी. व्ही. सूळ हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
          उमेदवार हे सहकारी बँका किंवा सहकारी पतसंस्थांचे  संचालक मंडळावर आहेत किंवा कसे याची माहिती घेणे, उमेदवारांने सहकारी बँक/ सहकारी पतसंस्थेत 50 हजार उचल अथवा एक लाख भरणा केला असल्यास त्याचा तपशिल घेणे, सहकारी बँका / सहकारी पतसंस्थेंमध्ये उमेदवारांचे नातेवाईक संचालक मंडळावर आहेत किंवा कसे याची माहिती घेणे, सहकारी बँका/ सहकारी पतसंस्थांमध्ये उमेदवार अथवा उमेदवारांच्या नातेवाईकाने केलेल्या व्यवहाराचे तपशिल घेणे, सहकारी बँका/ सहकारी पतसंस्थेंमध्ये 10 लाखाच्यावर रक्कम व्यवहार करणाऱ्या व्यक्तींची तपशिलवार व्यवहाराची माहिती घेणे. सहकारी बँका/ सहकारी पतसंस्थेंमध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून मोठया रक्कमेचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तींची व्यवहाराची चौकशी करुन त्याबाबत माहिती घेणे, राजकीय  पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँका/ पतसंस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून सदर राष्ट्रीयकृत, सहकारी बँका/ सहकार पतसंस्थेमध्ये होणाऱ्या व्यवहाराची वेळोवेळी तपासणी करुन काही संशयास्पद व्यवहार होत असल्यास तात्काळ अहवाल जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना सादर करण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.
         जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. डॉ. नारनवरे यांनी यावेळी अशा संस्थांमार्फत निवडणूक कालावधीत होणाऱ्या व्यवहारांची माहिती या समितीमार्फत घेण्यात येईल, असे सांगितले. यासंदर्भात संबंधित संस्थांची बैठक घेऊन त्यांना आचारसंहिता लागू झाल्यापासून ते निवडणूक कालावधीपर्यंत केलेल्या व्यवहारांची माहिती देण्यासंदर्भात सूचना देण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरी सहकारी बॅंका,  नागरी सहकारी पतसंस्था व मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटी यांच्या व्यवहारांवर ही समिती लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
         पाटील यांनी, जिल्हा उपनिबंधक, उस्मानाबाद यांच्यामार्फत नोंदविण्यात आलेल्या सर्व  संस्था व पतसंस्थेत होणाऱ्या सर्व व्यवहारावर  बारकाईने लक्ष ठेवून संस्थेमध्ये व्यापारी  वर्ग नियमित रोख रक्कमेचा भरणा करत होते. परंतु ते निवडणूकीच्या अधिसूचना लागू झाल्यानंतर रोख रक्कमेचा नियमित भरणा करत होते किंवा कसे किंवा नियमित व्यवहार करण्याचे बंद केले याबाबत बारकाईने नियंत्रण ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
         व्यापारी वर्गानी निवडणूकीची अधिसूचना लागू होण्यापूर्वी ज्या ठेवी राष्ट्रीयकृत, अन्य बँकेत , पतसंस्थेमध्ये,सहकारी संस्था तसेच बँकाशिवाय देवाण-घेवाण करणाऱ्या संस्थामध्ये जी ठेव डिपॉझीट ठेवण्यात आली होती ती ठेव निवडणूकीची अधिसूचना लागू झाल्यानंतर सदरील ठेव काढण्यात आलेली आहे काय ? यावरही बारकाईने नियंत्रण ठेवून अहवाल देण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
    प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना, त्यांच्या अंतर्गत जे बचतगट आहेत त्यांच्या अंतर्गत होणाऱ्या व्यवहाराची तपासणी करावी. बचत गटामार्फत निवडणूकीच्या काळात कोणत्याही वस्तुचे वाटप होणार नाही, यावर नियंत्रण ठेवावे व सर्व अहवाल स्वत: तपासून पाठविण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी यावेळी दिल्या. मतदार जागृतीसाठी बचत गटांनी संबंधित गावातील मतदारांनी 100 टक्के मतदान करावे आणि मतदानाचा हक्क बजावावा यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेने सर्व शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीच्या गावात 100 टक्के मतदान करण्याविषयी जागृत करुन मतदानाची टक्केवारीत वाढ होईल यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांना देण्यात आल्या.                 
 
Top