येरमाळा : कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहिण म्हणून ओळखल्या जाणा-या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवातील तिस-या दिवशी देवीला पुरण पोळीचा तसेच भाकरीचा नैवेद्य दाखवून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले असल्यामुळे भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळाली.
    तिस-या दिवशी पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येडेश्वरी देवीच्यज्ञा पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. शुक्रवार हा देवीचा वार असल्याने जिल्ह्यासह भाविकांनी आज पुरण पोळीचा, भाकरीचा नैवेद्य दाखवून पालखीचे दर्शन घेतले. परिसरातील भक्त सकाळपासूनच आपल्या बैलांना मोठ्या थाटा माटात सजवून यात्रेसाठी बैलगाडीने येऊन दर्शन घेतले. आपल्या बैलगाडीचा व झाडाच्या सावलीचा आधार घेत आपल्या घरून आणलेला स्वयंपाक सगे सोयरे व मित्र परिवारासोबत एकत्र बसुन जेवणाचा आनंद लुटताना दिसले.
    यात्रा झाल्यानंतर एक महिनाभरानंतर पेरणीला सुरूवात होत असल्याने शेतीसाठी लागणारे औजारे खरेदी करण्यासाठी शेतक-यांची यात्रेत अलोट गर्दी होती. हे यात्रेतील कांही व्यापा-यांशी चर्चा केली असता ते म्हणाले की या धावत्या युगात बैलगाडीची यात्रा ही गेल्या कांही वर्षापासून कमी होत आली आहे. त्यामुळे आमच्या धंद्यावरही परिणाम होत आहे. त्यातच अवकाळी पाऊस झाल्याने सर्वच व्यापा-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे धंद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या यात्रेमध्ये पाळणा तसेच खेळण्याची दुकानामध्ये खेळणी खरेदी करण्यासाठी चिमुकल्यासह नागरिकांनी गर्दी केली होती.
 
Top