उस्मानाबाद -: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीस उस्मानाबाद येथील सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
    अयुब शेख (रा. इटकळ, ता. तुळजापूर) याने 13 ऑगस्ट 2013 रोजी पत्नी अन्वरबी हिचा गळा दाबून खून करून घरात मृतदेह पुरला, अशी तक्रार राजभाई इमाम भांबरते (शेख) यांनी दिली होती. त्यानुसार नळदुर्ग पोलिस ठाण्यात अयुब याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पतीनेच गळा आवळून खून करून मृतदेह घरामध्ये पुरल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रामुख्याने फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, पंच, तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यानुसार शेख याने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. यामुळे अयुब शेख यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता डी. डब्ल्यू. पाटील (मेंढेकर) यांनी काम पाहिले.
 
Top