उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये मागील दोन तीन महिन्यामध्ये प्रचंड गारपीटीमुळे शेतक-यांच्या फळबागांचे व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ह्या नुकसानीचा अहवाल तयार करुन शासनाकडुन १९१ कोटी ८८ लाख रुपयाचे मागणी करुन ती मदत उपलब्ध करुन घेण्याचा प्रयत्न केला. शासनाकडे फक्त चार कोटी रुपये बाकी राहिले असून पुढील आठवड्यात तेही प्राप्त होतील. उपलब्ध झालेला निधी जिल्हा भरातील सर्व गारपीटग्रस्तांना आगामी पंधरा दिवसात बँकेमार्फत वितरीत केला जाईल अशी माहिती पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिली.
     जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील कांही गावातून गारपीटीचे चुकीचे सर्वेक्षण झाले अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अशा गावांचेही पुन्हा सर्वेक्षण करुन त्यांना न्याय द्यायचे काम सुरू आहे. यापुर्वी जिल्हा प्रशासनाकडे ९८ कोटी रुपये प्राप्त झाले होते व आता ९३ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्याचे वितरणही सुरू केले आहे.
       या अवकाळी पावसामध्ये वा-या वावदानामध्ये अनेक घरांचे पत्रे उडून जावून नुकसान झाले आहे. विज पडून अनेकांचा जीव गेला असून अनेक जनावरेही मृत झाल्याची घटना घडली आहे. तसेच या गारपीटमुळे अनेक शेतक-यांनी विविध कारणामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्याही केली आहे. शासनाच्या निकषानुसार पात्र ठरणा-या आत्महत्याग्रस्त शेतक-यांना तातडीची आर्थिक मदतही दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडे २२ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी ६ प्रकरणे शासकीय निकषानुसार पात्र ठरले आहेत तर १३ प्रकरणे अपात्र ठरले आहेत. विज पडून जिल्ह्यात ११ जण मृत झाले असून त्यांना तातडीचे १६ लाख ५० हजार रुपयाची मदत दिली आहे तसेच ७ जण जखमी झाले आहेत त्यापैकी तिघांना मदत दिली असून तिघांना तहसीलदारमार्फत मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
     जिल्हा प्रशासनाकडे विविध आपत्तीमध्ये लहान मृत जनावरांचे ४८७ प्रकरणे दाखल झाले असून त्यापैकी ४७६ प्रकरणांना ३ लाख ०३ हजार रुपयाची आर्थिक मदत दिली आहे तसेच मोठी ५३ जनावरे दगावल्याचेही प्रकरणे दाखल असून त्यापैकी ४० जनावरांच्या लाभाथ्र्यांना मदत वितरीत केली आहे. शेतक-यांच्या आत्महत्यामागे खाजगी सावकाराचा जाच असल्याची दोन प्रकरणे दाखल असून त्यापैकी एका खाजगी सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एक प्रलंबित आहे.
      गारपीट आपत्तीमध्ये झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतक-यांना तसेच घरांच्या नुकसानीबाबत अहवालानुसार आर्थिक मदत मिळवून दिली जाईल तसेच गतवर्षीच्या पाणीटंचाई काळात झालेल्या अधिग्रहणाच्या थकित रकमाबाबत पाठपुरावा करुन ५ कोटी १६ लाखापैकी ४ कोटी २३ लाख रुपये उपलब्ध झाले असून आगामी चार दिवसात अधिग्रहणाच्या थकित रकमा वितरीत केल्या जातील तसेच सध्यस्थितीत ज्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे त्या गावच्या मागणीनंतर प्रशासनाच्या माध्यमातून तीन दिवसात टँकर व अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याच्या सुचनाही जिल्हाधिका-यांमार्फत तहसीलदार व गटविकास अधिका-यांना दिल्या असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
 
Top