बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- जवळगाव मध्यम प्रकल्पातील बेकायदा खणलेल्या विहीरीसारख्या खड्ड्याला बुजविल्याने महिलेने आत्मदहनाचा लेखी इशारा दिला आहे. सारोळे (ता.बार्शी) येथील धोंडाबाई जाधव असे या महिलेचे नाव असून जनावराच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आपण असे केल्याचे तसेच आपल्यासारखे अनेक जणांच्या बेकायदा विहीरी तथा खड्डे का बुजविण्यात आले नाहीत असा प्रश्नही तिने केला आहे.
बार्शी तालुक्यात विविध तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्प इत्यादींच्या नजीक शेती असलेल्या शेतक-यांनी बेकायदा विहीरी व खड्डे खणून आपल्या शेतीला जास्त पाणी देऊन ऊस व बागायती पिके मोठ्याप्रमाणात घेतल्याचे दिसून येत आहे. त्यातील अनेक ठिकाणी मोठ्या तक्रारीही झाल्या असून पिंपळगाव येथे तर चक्क संपूर्ण गाव एक होऊन बेकायदा विहीर बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. दुष्काळाची परिस्थिती असताना जनावरे व माणसांच्या पिण्याचा प्रश्न उपस्थित होत असताना जादा उत्पन्न मिळावे, याकरीता मोठ्या विहीरी व मोठे पंप बसवून रात्रंदिवस पाणी साठ्याचा उपसा केला जातो. अधिकारी मात्र विहीरीचे व शेतीचे मालक कोण आहेत हे पाहून निर्णय घेतात. यातील धोंडाबाई जाधव ही अल्पभूधारक महिला शेतकरी असून तिच्या तक्रारीनुसार सारोळे, जवळगाव, आंबेगाव, भालगाव, भांडेगाव, मिर्झनपूर आदी ठिकाणच्या शेतक-यांनी अशाप्रकारे विहीरी व मोठ्ठे खड्डे घेतले आहेत. ते न बुजावता माझे एकटीचे बुजविले आहे. अधिकारी व कर्मचारी संगणमत करुन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. यात माझ्या मोटारचे नुकसान केले आहे. त्यामुळे दि. 15 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.