उस्मानाबाद :- स्वर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवला जातो. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनाही आता हे लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. येत्या 22 मे रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील नियोजन समिती सभागृहात यासाठी समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
       जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यासंदर्भात आज संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रुपाली सातपुते यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
      विविध योजनांचा लाभ या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी त्यांच्या विभागांच्या  योजनांची माहितीसह उपस्थित राहून ज्या योजनेतील लाभ या घटकांना देणे शक्य आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
    याशिवाय, उस्मानाबाद जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गीत रुग्ण  व उस्मानाबाद शहरातील अतिसंवेदनशील गटातील लोकांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व त्यासंदर्भात कृती आराखडा ठरविण्यासाठीही लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
 
Top