उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागामार्फत विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील  मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व  परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती या योजनेचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त तरतुदीनुसार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मंजूर येते. काही विद्यार्थ्यांना निधी अभावी  परीक्षेस बसण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे या संचालनालयाच्या निदर्शनास  आले आहे. ही गंभीर स्वरुपाची बाब असून अशी कृती करणारी महाविद्यालये कारवाईस पात्र राहतील.  परिक्षेस बसण्यासाठी अडवणूक होत असल्यास त्या विद्यार्थ्यांनी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन संचालक, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण, पुणे यांनी  एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
        गेल्या वर्षात विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी  ऑनलाईन अर्जही  मागविण्यात आले होते.  प्राप्त तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मंजूर करुन संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयाचे प्राचार्य  यांच्या बँक खात्यावर इसीएस मार्फत रक्कम जमा करण्यात आले आहे. तथापी  काही विद्यार्थ्याना तरतूदीअभावी  शिष्यवृत्ती व परीक्षा शुल्क मंजूर झाले नसल्यास सन 2014-2015 या वर्षात मंजूर करण्यात येणार  आहे. वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परिक्षेपासून कोणत्याही महाविद्यालयांनी वंचित ठेवल्यास संबंधित महाविद्यालयाविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येईल.
 
Top