बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शीतील बाह्यवळण रस्त्यावर स्कार्पिओ अडवून सोन्याचे दागीन्यांसह दोन लाखांचा ऐवज लुटणार्‍या पाच संशयितांना बार्शी पोलिसांनी अटक केली असून आणखी एका आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
     अक्षय सरकाळे (वय २२), दिपक सरकाळे (वय ४५) दोघे रा.लहूजी वस्ताद चौक,बार्शी, मंगेश सावंत (वय २२) रा.औद्योगिक वसाहत, आगळगाव रोड, दिलीप परदेशी (वय ३१) रा.कॅन्सर हॉस्पिटल जवळ, सूरज हाजगुडे (वय २६), रा.कथले प्लॉट अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ११ मे रोजी स्वामी समर्थ मंदिराजवळ एम.एच.२४ व्ही.२८९५ या वाहनावर दगडफेक करुऩ चाकूचा धाक दाखवून मोबाईलसह सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बार्शी नंतर अशाच प्रकारे ४ प्रवासी वाहने अडवून चाकू व कोयत्याचा धाक दाखवून कुर्डूवाडी-टेंभूर्णी रस्त्यावर लूटमार, पाच जणांना जखमी करत ४३ हजारांचा ऐवज लुटण्याचा प्रकार घडला. जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाहने अडवून लुटमार करण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिस अधिक्षक व मकरंद रानडे, अप्पर पोलिस अधिक्षक (सोलापूर ग्रा.) यांनी पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार यांना सूचना व मार्गदर्शन करुन गुन्ह्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी पो.ह.नारायण शिंदे, प्रविण चौधर, गणेश पवार, रविंद्र बाबर, अमोल घोळवे, विशाल घाडगे, मनोज भोसले, श्रीमंत खराडे, सादिक नाईकवाडी यांचे पथक तयार करुन तपास सुरु केला. पोलिसांच्या खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका संशयीतानंतर दुसरा असे पाच संशयीत पोलिसांच्या हाती लागले. अटक करण्यात आलेल्या संशयीतांकडून घरफोड्या व इतर गुन्ह्यांची आणखी माहिती तसेच या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न होत असून घटनेचा पुढील तपास स.पो.नि. अभिषेक डाके हे करीत आहेत.
 
Top