उस्मानाबाद :- जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स संसर्गीत व्यक्ती, देहविक्री करणा-या महिला तसेच समाजातील इतर घटकांकडून उपेक्षा पदरी येणारे  तृतीयपंथी व्यक्ती  यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन सन्मानाने स्वताचे आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
      येथील जिल्हा रुग्णालयातील डापकू सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय व प्राईड इंडिया स्पर्श विहान काळजी व आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्व अभियान  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी तहसीलदार सुभाष काकडे, नोडल अॅफिसर तानाजी माने, डॉ.राजमाने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणेश काकडे, एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. पौळ, नायब तहसीलदार प्रभु जाधव,  काळजी व आधार केंद्रचे प्रकल्प  समन्वयक सुजित जाधव, शिवदास चव्हाण, महजबीन शेख आदि उपस्थित होते.
        यावेळी जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे म्हणाले की, समाजातील वंचित घटकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती होणे व अडचणी सोडवून आपल्याशी हितगुज करण्यासाठी या राजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या तुमच्याशी निगडीत प्रत्येक योजनेचा लाभ तुम्ही घ्या. एचआयव्हीग्रस्तांसाठी शासनाकडून नि:शुल्क औषधे दिली जातात. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. जीवनात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रोगावर मात करुन जिद्दीने इतरापेक्षा किती वरचढ काम करत आहोत हे दाखवून दिले पहिजे.
          जिल्ह्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरुध्द महिलांना आपली बाजू सक्षम मांडण्यासाठी व निर्भिडपणे  विचारांची अदानप्रदान करण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोलीस विभागात महिला मित्र मंडळाची स्थापना करावी, विशिष्ट घटकांना एकत्र आणून योजनेचा लाभ देणे, सर्व विभागानिहाय योजनांची पुस्तकी तयार करुन महिलांना देणे व त्यांची आर्थीक उन्नती करणे, गरीब नागरिकांना नि:शुल्क विधीसेवा केंद्र स्थापन करणे, विविध योजनांची माहिती लोकांपर्यत पोचविण्यासाठी वेळोवेळी राजस्व अभियान घेणे, शहर कॅरीबॅग मुक्त करणे आदि विषयांवर डॉ. नारनवरे यांनी मार्गदर्शन केले.
         यावेळी बाळासाहेब गजेंद्र वाकरे, शैला नाईकनवरे, वत्सला अप्पा क्षीरसागर, गंगुबाई गाढवे, वर्षाराणी लांडगे, रुक्मिनी कुंभार, संतोष किसन गायकवाड, सत्यजेय वाकडकर आणि किसन कांबळे यांना प्रायोगिक तत्वावर तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभ, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधारकार्डचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर जिल्हा रुग्णालयामार्फत वैद्यकीय प्रमाणपत्र व वयाचा दाखला देण्यात आला.  ज्या महिला व व्यक्तींचे प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांनी याच ठिकाणी 13 जून रोजी होणाऱ्या या अभियानात कागदपत्राची पूर्तता करुन आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
       या अभियानात लिंक वर्कर स्किम, प्राईड इंडिया आधार व काळजी केंद्र, हस्तक्षेप प्रकल्प (टीआय) ( देह विक्री करणा-या महिलांसंबंधीत), पीपीटीसीटी, स्वंय शिक्षण प्रयोग, उस्मानाबाद या संस्थेच्या लाभार्थ्यांनी  व पोलीस कार्यालयामार्फत तृतीयपंथी यांनी या मोठया प्रमाणात सहभाग घेतला. या अभियानास तालुक्यातील मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार श्री. काकडे आणि डॉ.तानाजी माने आपले मनोगत व्यक्त केले. या आभियानाचे सूत्रसंचालन आर.बी.जोशी यांनी केले तर गणेश  काकडे यांनी आभार मानले.
 
Top