बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तालुक्यातील चांगल्या दर्जाची साखर निर्मिती करणार्या व सध्दया बंद पडलेल्या भोगावती उर्फ संतनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी टेंपलरोज कंपनीच्या वतीने मागणी करण्यात आली होती. त्याबाबत रितसर निविदा भरुन रक्कम भरली असली तरीही राजकिय दबावाने कारखान्याचे हस्तांतरण झाले नाही. नियमानुसार सहा वर्षांचे टेंडर निविदा काढणे गरजेचे असतांना केवळ एकच वर्षाची निवीदा काढण्यात आली होती. त्यावर टेंपलरोज कंपनीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर पुन्हा नव्याने टेंडर काढून जादा भाड्याची किमान ७ कोटी ९० लाखांचे भाडे आकारणी करण्याची अट घालण्यात आली. मंगळवारी दि.२० रोजी वैराग येथील संतनाथ कारखान्यामध्ये येऊन टेंपलरोज कंपनीचे देविदास सयानी, तांत्रभक विभागाचे मनोज सुर्यवंशी, भाऊसाहेब आंधळकर, दिपक आंधळकर, डुरे पाटील, संतोष निंबाळकर, गोविंद पंखे, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमक्ष कारखान्याची पाहणी करण्यात आली. यावेळी पाहणी केल्यानंर साडेसहा ते साल कोटी रुपयांचा खर्च करुन कारखाना सुरु करता येईल असा अंदाज तांत्रीक विभागाने सांगीतला. या कारखान्याची गाळपक्षमता १२५० टन आहे यासाठी ७ कोटी ९० लाख रुपये किमान भाड्यांची अट घालण्यात आली असून याचप्रमाणे तासगाव येथील २५०० टन गाळपक्षमता असलेल्या कारखान्यास चार कोटी रुपयांचे किमान भाडे आकारण्यात आले आहे. यावर आपण कायदेशीर मान्यता मिळवून भाडे कमी करण्यास भाग पाडू व शेतकर्यांच्या हितासाठी पुन्हा चांगल्या रितीने कारखाना चालू करुन कामगारांचा कायमचा प्रश्न निकाली काढू असे भाऊसाहेब आंधळकर यांनी म्हटले.