जिल्‍हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे
उस्मानाबाद :- जिल्ह्यातील महिलांना विविध योजनांचा लाभ देऊन तसेच युवतींना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन महिला सबलीकरणाचा प्रयत्न आता जिल्हा प्रशासन करणार आहे. विविध यंत्रणांच्या सहकार्याने आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने  महिला सुरक्षा व सबलीकरण कृती आराखडा तयार केला जात आहे.
       महिलांवरील अत्याचार व अन्यायाच्या घटना होऊ नयेत, महिलांना जिल्ह्यात सुरक्षित वातावरण असावे, कौटुंबिक पातळीवर आणि सार्वजनिक ठिकाणीही त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे त्यादृष्टीने विविध यंत्रणांचा समावेश करुन त्यांच्या माध्यमातून एक कृती आराखडा बनवला जात आहे. महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जीवनोन्नती अभियान, विधी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, पोलीस, विविध सामाजिक संस्थांसह विविध यंत्रणांचा यात समावेश असणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या यंत्रणांचा समावेश असणारा एक कृतीगट स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनातील विवध यंत्रणांचा यांत समावेश राहणार आहे.
      महिलांसाठी काम करणा-या विविध यंत्रणांतील ग्रामस्तरावरील महिला कर्मचा-यांचा समनवय साधून त्यांना विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देणे, गावातील महिलांपर्यंत ती पोहोचविणे, त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष ठेवणे आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामस्तरावर काम करणाऱ्या आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती व पर्यवेक्षिका, एएनएम, इतर महिला कर्मचारी, बचत गटांच्या महिला आदींचा समन्वय साधून त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या ग्रामस्तरावरील महिला कार्यकर्तींचीही मदत यासाठी घेतली जाणार आहे.
     हा कृती आराखडा तयार करण्याचा एक भाग म्हणून येत्या 28 मे रोजी जिल्ह्यातील महिलांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांची कार्यशाळा उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी त्याचे समन्वयक राहणार आहेत. त्याशिवाय, स्पर्श रुग्णालय, सास्तूर येथे दि. 3 जून रोजी जिल्ह्यातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या महिला अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी महिलाविषयक कृती आराखडा तयार करताना त्यात कोणकोणत्या बाबी अंतर्भूत कराव्यात, यादृष्टीने या दोन्ही कार्यशाळेत दिशा ठरविली जाणार आहे.
         कृती आराखड्यात ग्रामस्तरावरील सर्व त्या आवश्यक बाबींचा समावेश व्हावा, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखालील दोन उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. अनुक्रमे महिला सबलीकरण आणि कायदा अशा विषयावर या समिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सविस्तर अहवाल देणार आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने अशा प्रकारचा हा उपक्रम पहिल्यांदाच राबविला जात आहे.   
 
Top