बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील पाटीलचाळ येथे किरकोळ कारणावरुन लोखंडी पाईप, तलवार, दगड यांचा वापर झालेल्या भांडणात ६ जण जखमी झाले आहेत. कौस्तुभ पेठकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन बार्शी पोलिसांत ७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली आहे.
    प्रेम लाकाळ, सागर लाकाळ, रोहित लाकाळ, आकाश लाकाळ, राहुल तांबे, लखन सस्ते, राम सस्ते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गणेश जामदार, विशाल शेंडगे, समाधान डोंगरे, मिलींद खंडागळे, युवराज साळुंखे, कौस्तुभ पेठकर असे जखमी झालेल्यांची नावे असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान कौस्तुभचा मित्र समाधान डोंगरे याच्या घरासमोर सदरची घटना घडली. तू आमच्या समोर का उभा आहेस, आम्ही तुला जीवंत जाळून टाकू, अशी धमकी समाधान यास देण्यात आली, तसेच त्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर मारहाण झाली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
    सागर, रोहित, आकाश लाकाळ यांना अटक करुन बार्शी न्यायालयासमोर उभे केले असतां न्यायदंडाधिकारी व्हि.बी.मुल्ला यांनी एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. घटनेचा पुढील तपास सहा.पो.नि. अभिषेक डाके हे करीत आहेत.
 
Top