वैराग (महेश पन्‍हाळे) -: वैराग (ता. बार्शी) भागात गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत केले. या पावसाचा जोरदार फटका पिंपरी, साकत, घाणेगाव, हिंगणी या गावांना बसला. यामध्ये पिंपरीचे हिंगे कुटुंबिय जखमी झाले असून बेघर होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
         गुरुवारी रात्री आठ वाजता सुसाट्याचा वारा सुटून विजांचा प्रचंड गडगडाट झाला. यावेळी दीड तास कोसळलेल्या जोरदार पावसाने लोकांची धावपळ उडाली. या वादळी पावसाने वैराग, मानेगाव, ढोराळे, तडवळे, राळेरास, सासुरे, इर्ले- इर्लेवाडी, यावली, कोळगाव, पानगाव, साकत, पिंपरी, हिंगणी, घाणेगाव, नांदणी, सर्जापूर, लाडोळे आदी गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. पिंपरी गावामध्ये पावसाचे उग्ररुप पहायला मिळाले. इथल्या दत्तु हिंगे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. यावेळी दत्ततू हिंगे व त्यांच्या पत्नी पार्वती हिंगे हे दोघे जखमी झाले. या वादळी पावसाची तीव्रता इतकी अधिक होती की, शेतातील पत्र्यांची वस्ती उडून तरी गेलीच पण गावामधील घरावरीलही पत्रे उडाले. कुमकुवत बनलेल्या घरांच्या भिंती कोसळल्या तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे ही उन्मळून पडली. रात्री आठ वाजता चालू झालेल्या पावसामुळे अनेक गावातील विद्युतपुरवठा खंडीत ठेवण्यात आला. रात्री अनेक गावामधून पाऊस झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वित्तहानी वा जिवितहानीचा सविस्तर वृत्त हाती आले नाही. पण रात्रीच्या पावसाने शेतातील जनावरे गावाकडे आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली तर सगळीकडेच पाणी पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
 
Top