बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याकडे निवेदने व तक्रारी करुनही दुर्लक्ष केल्याने बार्शी तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बार्शी तहसिलसमोर धरणे आंदोलन केले. शनिवारी दुपारी बारा पासून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड, हनुमंत भोसले, सचिन आगलावे, किसन यादव, मुस्सा मुलाणी, वनराज यादव, दिलीप चव्हाण, सर्जेराव यादव, अजित परबत, तात्या शिंदे, दिलीप शिंदे, जीवन यादव, आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान मिळण्यासाठी पंचनामे करावे, नुकसानभरपाईतून कर्ज वसूली नको, सर्व ग्रामपंचायत येथे लाभार्थ्यांच्या नावाची यादी चिटकवावी, पाच दिवसांत खात्यावर रक्कम जमा करावी, तालुका कृषि विभागातील योजनांची मागील पाच वर्षांची सखोल चौकशी करावी, अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देऊन पेट्रोलचे दर कमी करावे, कृषि कर्ज पुरवठा कामी बँकांची चौकशी, मार्केट कमिटीच्या अंतर्गत व्यावसायिकांचे वजन काटे इलेक्ट्रॉनिक बसवावे, शिधापत्रिकावरील धान्य व केरोसिनचा काळाबाजार बंद करावा, स्वामीनाथन, रंगराजन समितीच्या शिफारसी लागू कराव्या, बेकायदा धंदे बंद करावे आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन बार्शी तहसिलसमोर धरणे आंदोलन केले.
 
Top