नळदुर्ग :- नगरपालिकेच्‍यावतीने नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी बांधलेल्‍या स्‍वच्‍छता गृहात तात्‍काळ पाण्‍याची व्‍यवस्‍था करावी. तसेच वीज पुरवठा करुनही स्‍वच्‍छतागृहे वापरात यावे, यासाठी प्रयत्‍न करावा. त्‍याचबरोबर शहरातील नागरिकांना वैयक्‍तीक स्‍वच्‍छता गृहे बांधण्‍यासाठी अनुदान उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍यावतीने निवेदनाद्वारे न.पा. मुध्‍याधिका-यांकडे करण्‍यात आली आहे.
    निवेदनात असे नमूद केले आहे की, नळदुर्ग शहरात सध्‍या शौचालयाचा प्रश्‍न गंभीर बनला असून गेल्‍या एक वर्षात न.पा.ने शहरात विविध सार्वजनिक स्‍वच्‍छता गृहे बांधले. त्‍यावर न.पा. चे लाखो रुपये खर्च झाले आहे. न.पा.ने बांधलेल्‍या स्‍वच्‍छता गृहात पाणी तसेच वीजपुरवठा नसल्‍याने या स्‍वच्‍छता गृहाचा वापर अद्याप नागरिकांनी केलाच नाही. त्‍यामुळे स्‍वच्‍छतागृह बांधण्‍यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च पाण्‍यात गेला आहे. न.पा. ने ज्‍या-ज्‍या‍ ठिकाणी सार्वजनिक स्‍वच्‍छता गृह बांधले त्‍या प्रत्‍येक स्‍वच्‍छता गृहात तात्‍काळ पाणी तसेच वीज पुरवठा सोय केल्‍यास स्‍वच्‍छतागृह नागरिकांना वापरता येतील. तसेच जे नागरीक स्‍वतःच्‍या घरात वैयक्‍तीक स्‍वच्‍छतागृह बांधण्‍यासाठी तयार आहेत, त्‍यांना अनुदान उपलब्‍ध करुन द्यावे, जेणेकरुन नागरीक जास्‍तीत जास्‍त वैयक्‍तीक स्‍वच्‍छतागृहे बांधतील. यामुळे ऐतिहासिक नळदुर्ग शहर निर्मल शहर होण्‍यास मदत होईल. तरी न.पा. प्रशासनाने तात्‍काळ याची दखल घेऊन सार्वजनिक स्‍वच्‍छता गृहात पाणी व वीज पुरवठा करावा, तसेच नागरिकांना वैयक्‍तीक स्‍वच्‍छतागृहे बांधण्‍यासाठी अनुदान उपलब्‍ध करुन द्यावे, अशी मागणी करण्‍यात आली आहे. या निवेदनावर मनसेचे शहराध्‍यक्ष जोतीबा येडगे, परिवहनचे उपाध्‍यक्ष बशीर शेख, शहर उपाध्‍यक्ष अलीम शेख, रमेश घोडके, दत्‍तात्रय धारवाडकर, अरुण जाधव, शिवाजी चव्‍हाण, गौस कुरेशी आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.

 
Top