उस्मानाबाद -: आगामी काळात रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमणामुळे होणारे धोके  व जीवीत हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्या सर्वसाधारण सभेत तात्काळ प्रस्ताव सादर करुन  जिल्ह्यातील रस्ते व नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहिम हाती घ्यावी,असे   निर्देश संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज दिले.
       येथील जिल्ह्याधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व नियोजनासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी हे निर्देश दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्यासह महसूल विभागाचे उप विभागीय अधिकारी, विविध विभागाचे कार्यकारी अभियंते, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
      अतिक्रमण हटविण्यासाठी तात्काळ अंतिम नोटीस देणे, रिक्षा स्टँडवरच उभा करणे, संबंधित लागणारी साहित्य व अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या यंत्रणांसोबत बैठका घेऊन नियोजन करुन अतिक्रमण हटवून होणारे संभाव्य धोके टाळावेत, असे निर्देशही डॉ.नारनवरे यांनी  संबंधित यंत्रणेला दिले.        
 
Top