उस्मानाबाद :- जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीसह विविध आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आणि आपत्तीपूर्व उपाययोजनेसाठी विविध गणेश मंडळे, युवा मंडळे, जयंती उत्सव समित्या, प्रतिष्ठान यांच्या युवा कार्यकर्त्यांची मदत घेतली तर कोणत्याही आपत्तीस तोंड देता येते. आपत्ती व्यवस्थापन हा धर्म असून त्यांचे सर्वांनी पालन करुन याप्रसंगी मोठी हानी टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिले. 
       येथील जिल्ह्याधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व नियोजनासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी हे निर्देश दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांच्यासह महसूल विभागाचे उप विभागीय अधिकारी, विविध विभागाचे कार्यकारी अभियंते, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
नैसगिक आपत्ती ही सांगून येत नाही त्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, खड्यामुळे रस्त्यांवरील धोका कोठे आहे त्याठिकाणचे रस्ते तात्काळ दुरुस्त करुन घेतल्यास रस्त्यांवरील अपघात टाळण्यास मदत होईल, गारपीट, पावसाळ्यातील डेंग्यू, मलेरिया, प्लेग, चिकनगुनीया या साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी स्वछतेची मोहिम हाती घेणे, आपत्ती व्यवस्थापनाचे  नियोजन तयार करा, शहरातील कचरा सुरक्षित स्थळी आहे की नाही, आग लागल्यास तात्काळ त्याठिकाणी पोहचणे शक्य व्हावे, यासाठी सर्व तहसील व प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील कारखान्याचे बॉयलर, केमिकल्स कारखाने सुरक्षित आहेत काय याची माहिती घेतली पाहिजे, असे डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.
      जिल्ह्यातील पाझर तलाव, साठवण तलाव यांची पाहणी संबंधित विभागाने करावी.  विविध यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनापासून होणारे धोके व त्यावरील उपाययोजनेबाबत  नियोजन तयार करुन नियंत्रण कक्षास सादर करावे, सर्व विभागांनी स्वत:चा नियंत्रण कक्ष सुरु करुन त्यासाठी नोडल ॲफिसरची नेमणूक करावी, या काळात मुख्यालय सोडताना नियंत्रण कक्षाला पूर्ण माहिती दिल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश डॉ. नारनवरे यांनी दिले.
 
Top