उस्‍मानाबाद :-  जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपीटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतक-यांनी या नुकसानीमुळे आत्महत्येसारखा दुर्देवी मार्ग निवडला. जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पावले तातडीने उचलली. जिल्हा प्रशासनाच्या या पावलांना आता साथ देण्यासाठी सामाजिक व शिक्षण संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचा निवासासह संपूर्ण शिक्षणाचा भार उचलण्याचे ठरविले आहे. संस्थेच्या पदाधिका-यांनी आज जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून ही भावना कळविली आणि जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनीही त्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेबद्दल विशेष कौतुक केले आहे.
        ज्या शेतकरी कुटुंबात कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाची परवड होत आहे. ती थांबविण्यसाठी या संस्थेने मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. अशा शेतकरी कुटुंबातील मुलींची संस्थेच्या पुणे येथील कर्वेनगर शैक्षणिक संकुलात निवास, भोजनासह संपूर्ण शिक्षणाचा खर्च ही संस्था करणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद अथवा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था,  कर्वेनगर पुणे- 411052 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय संस्थेचे सचिव श्री रविंद्र देशपांडे, मोबाईल क्रमांक- 9422034764/ 9730655264 किंवा 020-25313100/200 या क्रमांकावरही संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
         या कुटुंबाना मदतीची गरज लक्षात घेऊन संस्थेचे पदाधिकारी यांनी थेट आर्थिक मदतीपेक्षा या कुटुंबातील मुलींना स्वावलंबी बनवून स्वताच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीने त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी उचलण्याचे ठरविले आहे. ही संस्था भारतरत्न महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी 117 वर्षापूर्वी स्थापन केली. संस्थेत सध्या तीन हजाराहून अधिक मुली शिक्षण घेत आहेत.
       जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनीही संस्थेच्या या पुढाकाराबद्दल आभार मानले. संस्थेचे सचिव श्री. देशपांडे यांच्यासह त्यांचे सहकारीही यावेळी त्यांच्यासोबत होते.
 
Top