उस्मानाबाद -: शेतक-यांनी स्वत:कडे असलेल्या किंवा गावपातळीवर इतर शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याची हंगामापूर्वी घरगुती पध्दतीने उगवण शक्ती तपासून व त्यास बीज प्रक्रिया करुनच बियाणे पेरणी  करावी, जेणेकरुन चालू खरीप हंगामामध्ये सोयीबीन बियाण्याचा तुटवडा भासणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
    जिल्ह्यात दर वर्षी सोयाबीन पिका खालील क्षेत्रात वाढ होत आहे. खरीप हंगाम-2014 मध्ये अंदाजे 1 लाख 47 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी प्रति हेक्टर  65 किलो प्रमाणे 95 हजार 500 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. मागील हंगामात पिकांची काढणी व मळणीच्या वेळी पडलेल्या पाऊसामुळे उत्पादीत झालेल्या सोयाबीन बियाण्याच्या उगवण शक्तीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे यावर्षी बाजारात दर वर्षीच्या उपलब्धतेच्या केवळ 50 टक्केच बियाणे उपलब्ध होणार आहेत. बाजारातील सोयाबीन बियाणांचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने हे आवाहन त्यांनी केले आहे.
    शेतक-यांनी पुढील उपाययोजना कराव्यात. सोयाबीन हे पिक स्व-परागीत पिक असल्यामुळे एकदा पेरलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादीत होणारे बियाणे 3 वर्षापर्यंत वापरता येते. त्यामुळे नवीन बियाणे खरेदी करु नये, सध्या सोयाबीन विक्रीचा दर 45 रुपये प्रति किलो इतका आहे. चालू हंगामापर्यंत हाच दर 90 ते 100 रुपये प्रति किलो राहील.शेतकऱ्यांनी स्वत:चे बियाणे वापरल्यामुळे खर्चात 50 टक्के बचत होईल, बियाणांची साठवण कोरडया जागेत करावी व या बियाणावर दाब पडणार नाही याची दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांनी 5 पोत्यांची थप्पी लावावी, सोयाबीन बियाण्याचे आवरण अत्यंत नाजूक असल्यामुळे बियाणे हाताळताना काळजी  घेणे अत्यावश्यक आहे, पेरणीच्या प्रचलित पध्दतीनुसार हेक्टरी 75 ऐवजी 65 किलो बियाणे वापरले तर 4 लाख 44 हजार 444  इतकी अपेक्षित रोपांची संख्या येते, 70 टक्के पेक्षा उगवण कमी आढळून आल्यास तेवढया प्रमाणात दर हेक्टरी जास्तीचे बियाणे पेरणी करीता वापरावे. पेरणीसाठी टॅक्ट्ररचलित रुंद वरंबा सरी पेरणी यंत्राचा वापर केल्यास दर हेक्टरी बियाण्यामध्ये मोठी बचत होते, सरी टोकन पध्दतीने सोयाबीन बियाणेची लागवड केल्यास हेक्टरी 35 किलो बियाणे पुरेसे होते, शेतक-यांकडील बियाणांचा नमुना बिज परीक्षण प्रयोगशाळा, परभणी येथे पाठवल्यास 40 रुपये प्रति नमुना या नाममात्र दराने 15 दिवसात उगवण शक्ती तपासणी अहवाल मिळतो. यासाठी शेतकऱ्यांनी 1 किलो बियाणे पाठविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. 
 
Top