उस्मानाबाद :- आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत. पुरुषांच्या बरोबरीने त्या कार्यरत आहेत. मात्र, समाजाच्या उपेक्षित घटकातील महिला सक्षम होण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
     महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई संचलित जिल्हा एडस नियंत्रण कक्ष आणि  श्री. कुलस्वामिनी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती मोहिमेंतर्गत आळणी  येथील साई लोकनाट्य कला केंद्र येथे तेथील महिलांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.
         यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, शासनाच्या विविध योजना वेगवेगळया माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी असे विधायक कार्य हाती घेऊन त्यांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. प्रत्येकाचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. ज्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यांना आरोग्य कार्ड देऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. या उपेक्षित महिलांना स्वताच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून केला जाईल. तसेच महिला व बालविकास विभागाचे अधिकारी दरमहा या केंद्राला भेट देऊन तेथील महिलांच्या अडीअडचणी सोडवतील, असेही त्यांनी नमूद केले.
        प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक तानाजी माने म्हणाले की, या विधायक कार्यास जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अशी तपासणी शिबीरे घेऊन महिलांच्या आराग्याची काळजी घेतली जाईल व प्रत्येक सहा महिन्यानंतर तपासणी केली जाईल असे सांगीतले.
         महिलांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी ही संस्था आपल्या जिल्हयात कार्यरत आहे. ज्या स्त्रियांना औषधोपचाराची गरज आहे त्यांना औषधोपचार देणे, तसेच त्या मानसिक व शारिरिक रित्या सुदृढ राहण्यासाठी या प्रकल्पातून काम केले जाते. असे या संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ.दिग्गज दापके यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
        जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते प्रथम साईबाबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी डॉ. दिग्गज दाबके, शिवदार चव्हाण, श्री. काकडे, पत्रकार संतोष जाधव तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.
 
Top