उस्मानाबाद :- येत्या खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांचा काही प्रमाणात जिल्ह्यात तुटवडा जाणवण्याची शक्यता गृहित धरुन त्यादृष्टीने शेतक-यांना बियाणे कसे उपलब्ध करुन देणार याचे नियोजन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. सध्या उपलब्ध असणारे बियाणे, विविध कंपन्यांकडून उपलब्ध होणारे बियाणे आणि शेतक-यांकडून उपलब्ध होणारे बियाणे याचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय, काळाबाजार होऊ नये म्हणून सोयाबीन बियाण्यांची विक्री करणा-या व्यापा-यांकडील बियाण्यांचीही माहिती घेतली जात आहे.
        येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोयाबीन बियाणे उपलब्धता आणि त्या अनुषंगाने खरीप हंगामातील तयारी यासंदर्भात सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांची बैठक घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार आदींची यावेळी उपस्थिती होती.
        डॉ. नारनवरे यांनी यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांना गावनिहाय सोयाबिन बियाण्यांची उपलब्धता तपासण्याचे आदेश दिले. प्रत्येक सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन संबंधित गावात बियाण्यांची आवश्यकता किती, उपलब्ध किती आणि आवश्यक असेल तर कसे उपलब्ध करुन देता येईल यासंदर्भात ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायक यांनी आढावा घेण्याचे आदेश त्यांनी दिले. याशिवाय, शेतकऱ्यांनी ठराविक कंपन्यांच्या बियाण्यांचा आग्रह धरु नये, यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. त्यासाठी बियाणे महोत्सव ही संकल्पना राबवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.  जिल्ह्यातील गोदामांची तपासणी करुन बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्याचे निर्देश डॉ. नारनवरे यांनी तहसीलदारांना दिले.
         बियाणे तसेच खत विक्री करणा-या दुकांनातील बियाणे विक्री तसेच तेथील साठ्याचा दैनंदिन अहवाल नियुक्त कर्मचा-यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
Top