उस्मानाबाद -: लोहारा तहसील कार्यालयातील लिपीक एम.आर.नटवे आणि प्रतिनियुक्त एस.ए.पोतरे लिपीक आणि ए.आर.माढेकर,अव्वल कारकून   या तीन कर्मचा-यांनी त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शासन सेवेतून  शासन नियमान्वये निलंबीत केल्याची माहिती तहसीलदार, लोहारा यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.
        नटवे, लिपीक यांच्यावर संकीर्ण व सांख्यिकी या विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. अनेक वेळा कार्यालयातील बैठकीत प्रलंबित प्रकरणे निकाली न काढणे याबाबत समज देण्यात येऊनही प्रत्येक वेळी शाररीक अस्वस्थामुळे काम करणे शक्य नसल्याचे कारण देत असत. सदर कर्मचारी कामकाजासाठी अकार्यक्षम आहे तर  श्री. पोतरे,लिपीक, यांच्याकडे भूकंप पुनर्वसन व नैसर्गिक आपत्ती या महत्वाच्या विभागाचे कामकाज होते. तसेच बँकेतून  दैनंदिन अनुदान वाटप अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात कूचराई करत आल्याने  तसेच त्यांच्या दप्तर अद्यावत न ठेवल्यामुळे  वारंवार कारणे दाखवा नोटीस देऊनही कामकाजात कसूर केल्याचे, तर श्री.माढेकर, अव्वल कारकून यांच्याकडे भूसंपादन, कुळ, ईनाम, धार्मीक व सीलींग या महत्वाच्या विभागाचा कार्यभार होता. प्रलंबित प्रकरणे,अद्यावत ठेवली नसल्यामुळे आदेशित करुन कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. तरीही त्यांनी कर्तव्यात कसूर झाल्याचे  आढळून आल्याचा ठपका ठेवून उपरोक्त तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचेही  तहसीलदार, लोहारा यांच्या आदेशात नमूद केले आहे.
 
Top