मुंबई -: मुंबई इंडियन्‍सचा केरॉन पोलार्ड आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा गोलंदाज मिशेल स्‍टार्क यांची एकमेकांवर चेंडू आणि बॅट फेकण्‍यापर्यंत मजल गेली. स्‍टार्कने पोलार्डला चेंडू फेकून मारला तर पोलार्डनेही रागाच्‍या भरात स्‍टार्ककडे बॅट भिरकवली. आयपीएल सत्रात वाद होणार नाहीत, अशी ग्‍वाही संचलन परिषदेने दिली असतानाच खेळाडूंदरम्‍यान मैदानावरच अशी भांडणे झाल्‍याने आता या दोघांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
       मुंबई इंडियन्‍सची फलंदाजी सुरु असताना 17 व्‍या षटकात ही घटना घडली. स्‍टार्कने पोलार्डला बाऊन्‍सर टाकला. त्‍यावर पोलार्डने हुक मारण्‍याचा प्रयत्‍न केला. पण तो फसला. यावर स्‍टार्क पोलार्डकडे पाहून बडबडला. पोलार्डनेही त्‍याला बॅट दाखवून प्रतिउत्‍तर दिले. मग स्‍टार्क चांगलाच भडकला आणि पोलार्डच्‍या दिशेने चेंडू थेट फेकून मारला. पोलार्डचीही मग सटकली. त्‍याने थेट आपली बॅट स्‍टार्कच्‍या दिशेने भिरकावली. सुर्दैवाने बॅट हातातून निसटून पोलार्ड जवळच पडली. यानंतर रॉयल चॅलेेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीने मध्‍यस्‍ती करुन हा वाद मिटवला. नंतर पोलार्डने पंचाजवळ जाऊन तक्रार केली. या लढतीत आरसीबीच्‍या खेळाडूंनी रडीचा डाव खेळला. अँडरसनची विकेट घेतल्‍यावर यजुवेंद्र चहलही त्‍याच्‍याकडे पाहून बडबडला. युवराजने त्‍याची समजूत घातली. चहलने नंतर पंचांचीही माफी मागितली.
 
Top