उस्मानाबाद :- जिल्ह्यातील नागरिकांना उपयुक्त ठरणा-या राजीव गांधी  जीवनदायी आरोग्य योजनेचे कार्ड वाटप जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आले.
      येथील उस्मानाबाद नगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात डॉ. नारनवरे यांनी प्रातिनिधीक स्वरुपात कार्डचे वाटप केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत उत्पन्न, रहिवाशी प्रमाणपत्राचे यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात 8 जणांना वितरण करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे, तहसीलदार सुभाष काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
       नगरपालिका क्षेत्रात संबंधित नगरसेवकांनी आपल्या वॉर्डातील कामांबाबत दक्ष राहणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ. नारनवरे म्हणाले की, नागरिकांना जीवनदायी आरोग्य योजनेचे हे कार्ड दाखवून शासकीय रुग्णालयात उपचार घेता येतील. जिल्ह्यातील जवळपास 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे त्यांनी नमूद केले. नगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या खासगी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे, त्याची यादी प्रत्येक वॉर्डात लावून ती प्रसिद्ध करावी, अशा सूचना केल्या.
आचारसंहिता संपल्यानंतर आरोग्यकार्ड वाटपाचे नियोजन वॉर्डनिहाय करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.     
 
Top