उस्मानाबाद :- अल्पसंख्याक समाजातील युवक युवतींच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले असून जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
     येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शाळांच्या मुख्याध्यापकांशी डॉ. नारनवरे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अल्पसंख्याक बहुल शाळांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शैक्षणिक विकासासाठी शाळा करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. शाळेत शिकणारी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी शाळा सोडल्यानंतर काय करतात, त्यांना व्यवसायाभिमुख कौशल्यपूर्ण शिक्षण देता येईल का, बाजारपेठेशी निगडीत व्यवसायाधारित शिक्षण त्यांना देता येईल का, अल्पसंख्याकांसाठी असणाऱ्या विविध योजना राबवून त्यांचा थेट लाभ संबंधितांना मिळण्यासाठी कशा प्रकारे कार्यक्रमाची आखणी करता येईल, याबाबत एकत्रित आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी एम.के. भांगे यांना दिले. त्यासाठी समिती गठित करुन अल्पसंख्याक योजनांची अंमलबजावणी करणारे विविध विभागप्रमुख, अल्पसंख्याक शाळांचे मुख्याध्यापक यांचा त्यात समावेश करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. या समितीने एका आठवड्यात कार्यक्रमाची आखणी कशा पद्धतीने करावी याबाबतच्या सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.            
 
Top