उस्मानाबाद :- धार्मिक ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे यांच्या दर्ग्याचा उर्स दि. १२ ते २१ मे, २०१४ या कालावधीत साजरा होणार आहे. धार्मिक सद्भावना आणि शांततेच्या वातावरणात हा उर्स साजरा व्हावा उर्स कालावधीत स्वयंसेवकांमार्फत या परिसरात देखरेख, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिसरावर नजर आणि मद्यपान करणाऱ्यांवर कारवाईसाठी ब्रेथ अॅनालायझरमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज उर्स आयोजनाची बैठक घेऊन या आयोजनासंदर्भात सूचना केल्या.
       हजारो भाविक या उर्समध्ये सहभागी होतात.  एकात्मतेचे प्रतिक असणा-या या उत्सवाचे पावित्र्य कायम राखणे ही सर्व शहरवासीयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या उत्सवात प्रत्येकाने आपले योगदान देणे महत्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत चांगल्या उत्सवाला गालबोट लागणार नाही, हे आपण पाहिले पाहिजे, असे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, तहसीलदार सुभाष काकडे, जिल्हा वक्फ अधिकारी यांच्यासह विविध मान्यवर तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. 
     या उर्सचा प्रारंभ दि. १२ रोजी पंखा मिरवणूकीने होणार आहे. दि. १३ रोजी सेहरा मिरवणूक, दि. १४ रोजी गुसल पाणी मिरवणूक, दि. १५ रोजी संदल मुबारक मिरवणूक, दि. १६ रोजी कव्वाली कार्यक्रम व चिरागा कार्यक्रम, दि. १७ रोजी ज्यारत व कव्वाली कार्यक्रम, दि. १८ रोजी धार्मिक कव्वाली, १९ रोजी मुशायरा, २० रोजी गजल गायन आणि २१ रोजी कुस्ती स्पर्धा तसेच आतशबाजी आदी कार्यक्रम होणार आहेत.
       प्रत्येक कार्यक्रमाचे तपशीलवार  वेळापत्रक तयार करावे, संदल मार्गावरील खड्डे बुजवावेत, महत्वाच्या दिवशी भारनियमन टाळावे, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय,  विक्रीस असणाऱ्या अन्न पदार्थांची तपासणी, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना, नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य यंत्रणेचे पथक ठेवण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी दिल्या.
      जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले आणि या सूचनांची अंमलबजावणी तंतोतंत व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असून नागरिकांनी पोलीसांच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले.
 
Top