बार्शी (मल्लिकार्जुन धारुरकर) : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्याने शिवसेनेला पूर्ण मतदारसंघात ५७ हजार ७११ मतांची आघाडी दिली. ग्रामीण आणि शहराचा विचार करता बार्शी शहराने १० हजार ९४१ तर ग्रामीण भागातून ४६ हजार ७७० मतांची आघाडी दिली. मोदींची प्रचंड लाट तालुक्यात दिसून आली. प्रत्येक बुथवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी होती. परंतु मतदारांनी कोणत्याही प्रचाराला बळी न पडता शिवसेनेच्या रविंद्र गायकवाड यांना मोठे मताधिक्य दिले. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी या निवडणूकीत अप्रत्यक्षपणे तर त्यांच्याकार्यकर्त्यांनी उघडपणे शिवसेनेचा केलेला प्रचार यावेळी शिवसेनेच्या पथ्य्यावर पडला. भाऊसाहेब आंधळकर यांनीही तालुक्यात सभा घेऊन प्रचारफेर्‍या काढल्या. मोदी लाटेचा पुरेपूर फायदा यावेळी शिवसेनेला मिळाला. नामदार दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक म्हणून बार्शी तालुक्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे नाव आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावरच आमदारकी मिळविली होती. आमदारकी पाठोपाठ, पंचायत समिती, जिल्हापरिषद व नगरपरिषदेवरही मोठ्या संख्येने उमेदवार निवडणून आणत बार्शी तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढविण्यात राऊत यांचा सिंहाचा वाटा आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत पक्ष कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु आहे.
     मधल्या काळात काही अपरिहार्य कारणास्तव राजेंद्र राऊत हे शिवसेनेपासून दुरावले असले तरी आगामी विधानसभेसाठी पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास अत्यंत चांगल्या रितीने जबाबदारी सांभाळून निसटता पराभव होऊन गेलेली आमदारकी पुन्हा आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतील अशी चर्चा सर्वत्र होत आहे. मागील काही वर्ष व महिन्यांचा विचार करता बार्शी तालुक्यात शिवसेना पक्षाची बांधणी पाहिजे तितक्या जोमाने झाली नाही. सर्वत्र भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, असुरक्षीता, महागाई इतके मोठे प्रश्‍न असतांना बार्शी तालुक्यातील शिवसेना पक्षाकडून लोकांना अपेक्षीत रान उठवले नसल्याचे दिसून आले. हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे अनेक मावळे बार्शी तालुक्यात आहेत परंतु त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी नेत्यांना वेळ नाही. शिवसेना पक्षाच्या शाखा वाढविण्यासाठी, गावोगावी फलक लावणे, पुनर्बांधणी करणे, दुरावलेली मने जुळवून आणणे यामध्ये अपयश दिसून आले. राष्ट्रवादीतून अचानक शिवसेनेत आलेले राजेंद्र मिरगणे यांनी तर या पक्षात आपण जुने निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे भासवून केलेली जाहीरातबाजी अनेकांना भावली नाही. मिरगणे यांना केवळ शिवसेनेचे तिकीट मिळवून कसलाची प्रचार न करण्यासाठी राष्ट्रवादीकडून पाठविल्याची चर्चा बरीच दिवस सुरु होती. यानंतर आता राजेंद्र राऊत यांची जातीच्या आधारावरील मते विभागली जावीत, शिवसेनेची उमेदवारी राऊत यांना मिळू नये, शिवसेनेची जागा धोक्यात यावी आणि राऊत यांचाही पत्ता कट व्हावा याकरिता त्यांना सेट केल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. मिरगणे यांच्या तेलगिरणी चौकातील जागेचे भूमिपूजन औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल यांनी केले, पायाभरणी समारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली त्यांच्या मुख्य सभागृहातदेखील अजित पवार यांचे छायाचित्र नेहमी दिसून येत होते. मिरगणे इच्छुक असेल्या उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादीने पुन्हा एकदा डॉ. पद्मसिंह पाटील यांनाच देण्यात येणार यावर शिक्कामोर्तब केल्याने, मिरगणे यांनी अचानकपणे मी शिवसेनेचा जुना कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले व अजित पवार यांच्या छायाचित्राच्या जागी शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र लावले. वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या शिवसेनेचे काम करणार्‍या जुन्या कार्यकर्त्यांनी म्हटले की मी तर यांना कोणत्याच जिल्ह्यात शिवसेनेचे काम करतांना पाहिले नाही मग अचानक कसे काय जुने शिवसैनिक आणि कट्टर शिवसैनिक झाले.

       भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलीस अधिकारी पदाच्‍या नौकरीचे दोन वर्षे शिल्‍लक असताना शिवसेनेचे कार्य जोमाने सुरु करुन राजीनामाही दिला. आपले काय व्‍हायचे ते हाेवो, पण आमदार दिलीप सोपल यांचा विरोध करणार, असे जाहीर करुन बार्शी तालुक्‍यातील शिवसैनिकांना एकत्र करण्‍याचा प्रयत्‍न केला.
      लोकसभेला बार्शी तालुक्‍यातून शिवसेना पक्षाला चांगले मताधिक्‍य मिळाले, हेच टेंपो पुढे ठेवून शिवसेना पक्षाने विधानसभेच्‍या उमेदवाराची योग्‍य निवड केल्‍यास पुन्‍हा एकदा शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्‍याचे भगवे वातावरण निर्माण झाले आहे. बार्शी तालुक्‍यातील राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर हे तीन उमेदवार विधानसभेसाठी शिवसेनेतून प्रयत्‍न करतील. यापैकी पक्ष कोणा एकावर जबाबदारी सोपवेल. यानंतर तिकीट मिळाले नाही तर यातील कोण नाराज होऊन काय करेल व त्‍यांची ताकद कितपत असेल याची चर्चा सुरु झाली आहे.
 
Top