पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी-पाथरी रस्त्याची खुपच दुरावस्था झाली असुन रस्त्यावर चिल्लारी व खडयांचे साम्राज्य पसरलेले आहे. या नादुरूस्त रस्त्यांमुळे पांगरीला शाळेत शिक्षणासाठी येणा-या शालेय विदयार्थांनाही अनंत यातनांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी-विद्यार्थींनींना खराब रस्ते रस्त्यावर आलेल्या काटेरी वनस्पती आदीचा त्रास सहन करतच दिनक्रम काटावा लागत आहे. पावसाळयात तर शालेय विद्यार्थांना आपल्या सायकली अक्षरक्षः चिखलात रूतल्यामुळे रस्त्यावरच सोडुन शाळा गाठावी लागते.
रस्त्यांवर चिल्लारीचे आक्रमण
    पांगरी शहराला जोडणा-या पाथरी-पांगरी, शिराळे-पांगरी आदी रस्त्यांच्या कडेला असलेल्या सरकारी बाभळी, यालतार आदी विविध झांडांचे रस्त्यांवर आक्रमण झालेले आहे. वाहनचालकांना या वाढलेल्या चिल्लारीतुन वाट काढत पुढे जावे लागते. पाथरी रस्त्यावर वाढलेल्या चिल्लारीमुळे वाहनचालकांना अंदाज न आल्यामुळे अनेक वेळा अपघातास सामोरे जावे लागलेले आहे. मात्र संबंधित प्रशासन त्यांना याचे कांही देणे घेणे नसल्यासारखेच वागताना दिसत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडुन एखादा बळी या पाथरी रस्त्यावर गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्‍न या मार्गावरील शेतक-यांसह वाहनचालकांमधुन विचारला जात आहे.
रस्त्यांवर शेतक-यांचे अतिक्रमण
    शासनदरबारी अधिकृत नोंद असलेले मात्र प्रशासनाच्या डोळेझाक प्रवृत्तीमुळे अजुनही डांबरीकरणाचा स्पर्श न झालेले अनेक रस्ते पांगरी परिसरात अस्तीत्वात असुन ते रस्तेच सध्या शेवटची घटका मोजत आहेत. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संबंधीत रस्त्यांवर स्थानिक शेतक-यांनी अतिक्रमण करून रस्त्यांवरच शेती करण्‍यासस सुरूवात केली असल्याचे दृष्य परिसरातील अनेक गांवातुन पहावयास मिळत आहे. अतिक्रमण केलेले शेतकरी स्थानिक व दैनंदीन संबंधातील असल्यामुळे तक्रार करण्‍यास कोणीही धजावत नसुन शिल्लक असलेल्या जेमतेम रस्त्यांवरूनच रहिवाशी व प्रवाशी वाटचाल करत आहेत. शासनाकडुन रस्त्यांपोटी मावेजा उचलुनही पुन्हा रस्त्यांवर अतिक्रमण हे कृत्य जरा जास्तच होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तरी संबंधीत विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांनी पांगरी विभागातील शासकीय रस्त्यांची पाहणी करून रस्त्यावर अतिक्रमण करणा-या शेतक-यांना समज अथवा अधिकृत नोटीसा देऊन रस्त्यांवरील अतिक्रमण काढुन टाकण्‍यास सांगावे, अशी जनतेची मागणी आहे.
    शासकीय, निमशासकीय कामांच्या निमित्ताने पांगरीला जाणे जिवावर उदार होऊनच अशी कांहीशी या भागातील लोकांची विचारसरणी तयार होत आहे. खराब रस्त्यांने पांगरीला जाताना गाडया नादुरूस्त होणे, पम्चर होणे, अपघात होणे, गाडी घसरणे आदी प्रकार नित्याचे होऊन गेले आहेत. शेजारील गावात एखादी दुदैवी घटना घडल्यास अथवा अपघात घडल्यास जखमीला पांगरी ग्रामिण रूग्णालयात घेऊन येताना रूग्णांसह समवेतच्या लोकांना नादुरूस्त रस्त्यांमुळे अनंत यातना सहन करत रूग्णालय गाठावे लागते. पांगरी पोलिसांना तात्काळ एखाद्या खेडयात पोहोचण्‍याची वेळ आली तर त्यांनाही खेडयात व घटनास्थळावर वेळेवर पोहचता येत नाही. यापुर्वी करण्‍यात आलेले रस्तेही निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे जनतेची ओरड आहे. पांगरीला जोडणा-या सर्व रस्त्यांची दुरूस्ती करून पांगरीसह परिसरातील जनतेच्या नित्याची गैरसोय दुर करावी, अशी पंचक्रोशीतील लोकांची मागणी आहे.
    हा रस्ता आमच्याकडे येत नसल्याचे उडवाउडवीचे उत्तर जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन दिले जात असुन मग या रस्त्याचा मालक कोण? असा प्रश्‍न या भागातील शेतक-यांसह जनतेमधुन विचारला जात आहे.
 
Top