वैराग (महेश पन्‍हाळे) -: 'मन' दिसत नाही म्हणून आपण मानायला तयार नाही आणि जर आहे तर ते दिसले पाहिजे, असा आपला समज आहे. सर्व सिध्दीचे कारणंच मन आहे. त्यामुळे आपल्याला दिसत नसले तरी होणारी जाणीव म्हणजे मन, असे प्रवचनकार ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांनी दुसरे पुष्प गुंफताना वैरागमध्ये मनाची मानसशास्त्रीय व्याख्या केली.
      'मन करा रे प्रसन्न' या विषयावर वैरागमध्ये चालू असलेल्या प्रवचनमालेच्या दुसर्या दिवशी प्रसिध्द प्रवचनकार ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांनी मनाची प्रवृत्ती नेहमी अधोगतीकडे ओढत नेते हे मार्मिक दृष्टांत देवून पटवून दिले. यावेळी त्यांनी मांडलेला विवाहसोहळा सर्वांनाच विचार करायला लावून गेला. या विवाहाप्रमाणे मन नावाच्या राजाचे लग्न दोन पत्नीबरोबर होते. त्यापैकी एक प्रवृत्ती आणि दुसरी नवृत्ती. मनाला प्रवृत्तीपासून सहा मुले आणि सहा मुली होतात. ही बाराही बाळंतपणे दुर्बध्दीने केली असून त्यांना जी सहा मुले झाली त्यांची नावे मोह, काम, क्रोध, मत्सर, दंभ, लोभ अशी आहेत. तर मुलींची नावे आशा, तृष्णा, कल्पना, इच्छा, भ्रांती, वासना अशी आहेत. या बारा जणांबरोबर सवंगडी म्हणून खेळण्यासाठी अविवेक, अवलती, अवचक्षणा येत असल्याचे महाराजांनी सांगितले. ह्या सार्या प्रवृत्तीच्या गोतावळ्यामुळे मन प्रवृत्तीमुळे विकृतीच्या मायाजाळात सापडत जाते.
          बंधन, मोक्ष, सुख, समाधान हे सारे मनावर अवलंबून असते. बंधनच नसेल तर कुणाला मुक्त म्हणायचे, आत्मस्वरुप कशानेही बांधलेले नाही. आपली मानसिकता शब्दाद्वारे स्पष्ट करताना मन महत्वाची भूमिका बजावते. अध्यात्मिक आणि प्रापंचिक उन्नती देखील मनावरच आधारलेली असते. याबरोबर सत्ता ह्या दोन प्रकारच्या असतात. एक पारमार्थिक सत्ता जिला खरे म्हणतात आणि दुसरी प्रतिभाविक सत्ता जिला खोटी सत्ता म्हणतात. अशा दोनच सत्ता आढळत असताना आता तिसरी सत्ताही उदयास आली आहे. जिला व्यावहारिकसत्ता म्हणतात. या सत्ता ज्याच्या त्याच्या मनातील सुख-इच्छांवर अवलंबून आहेत. प्रपंचातील वस्तू कितीही मिळाल्या तरी इच्छा वाढतेच, पण पारमार्थिक वस्तू मिळाली की इच्छा संपते. कितीही श्रीमंत असला तरी पाहिजे- पाहिजे म्हणून मागणारा नेहमीच गरीब बनतो, पण आहे त्यात समाधान मानून आता बास, पुरे म्हणणारा मनाने श्रीमंत बनतो, असेही ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.
 
Top