पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) या निमशहरी गावाला जोडणारे सर्वच रस्ते नादुरूस्त व खडेमय झाल्याबाबत तुळजापूर लाईव्‍हवर वृत्तमालिका प्रसिध्‍द करून प्रशासनाला जाग आणण्‍याचे काम केल्यामुळे या भागातील नादुरूस्त रस्ते लवकरच चकचकीत व गुळगुळीत होतील, अशी आशा परिसरातील प्रवाशांना व जनतेला वाटु लागली असुन प्रशासनही या वृत्तमलिकेने खडबडुन जागे झाले आहे. लवकरच या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत व कामे सुरू करण्‍याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे अधिकारी व पुढा-यांनी बोलताना सांगितले आहे.
    याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांकडे या नादुरूस्त रस्त्यांबाबत व त्यांच्या दुरूस्तीबाबत माहिती घेतली असता कारी, पांगरी, चारे, काटेगांव या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेला रस्ता आता बार्शीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्‍यात आला असुन या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 28 म्हणुन मान्यताही मिळाली आहे. या रस्त्याचे लवकरच डांबरीकरणाचे काम मार्गी लागेल असे सांगितले. तसेच पांगरी-उक्कडगांव रस्त्याचीही निविदा प्रसिध्‍द झाली असुन ते कामही सुरू होईल, असे सांगितले. बार्शी-पांगरी दरम्यान घारी गावाच्या आसपास नादुरूस्त झालेल्या रस्त्यांचे टेंडर प्रक्रियेत असुन तात्काळ खडे भरून घेण्‍यात येतील, असे बार्शीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.बळी यांनी भ्रमनध्वनीवर बोलताना सांगितले.
   पांगरी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा सोलापुर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते संजय पाटील-चारेकर या नादुरूस्त रस्त्यांसंदर्भात बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्यांना मिळणारा विकास निधी अत्यप स्वरूपात असुन मतदारसंघ विस्तीर्ण आहे. वर्षाकाठी मिळणारा पंधरा लाख रूपयांचा निधी कुठ कुठ खर्च करायचा असा प्रश्‍न सदस्यांसमोर असतो तरीही शिराळे, पांगरी, पांढरी या रस्त्यांच्या कामांना आपण निधी दिल्याचे सांगुन रस्ते मोठ-मोठे असल्यामुळे सार्वजनिक बंधकाम विभागाकडुनच या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो, असे भ्रमनध्वनीवर बोलताना सांगितले.
 
Top