उस्मानाबाद -: जिल्ह्यात प्रत्येक यंत्रणेने अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता ते रोखण्यासाठी जिल्ह्यातील धोक्याचे वळण व अपघात केंद्राची एकत्रित यादी तयार करावी. संबंधित धोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावून अपघात रोखण्यासाठी रस्त्यावरील खडे बुजविण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या रस्त्यांचे अभियंत्याकडून सर्वेक्षण करुन उपयोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. 
    येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात रस्ते सुरक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, पोलीस विभागाचे संभाजी पाटील, जि.प.आरोग्य विभागाचे डॉ.फुलारी, वृषाली तेलोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    या बैठकीत मार्गदर्शन करतांना डॉ.नारनवरे म्हणाले की, रस्त्यांच्या अतिक्रमणाबाबत कायदेशीर कार्यवाही करुन त्या ठिकाणी दुतर्फी वृक्ष लागवड, सौदर्यकरण करावे. अनाधिकृत पार्कीगसाठी पार्कींग व नो पार्कींग झोन तयार करण्याचे कामांसह पथदिवे, टुरींग मशीन, सिग्नल, डिव्हायडर, रीफलेक्टर, सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविणे, होर्डिग्जबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे, वर्षनिहाय अपघात किती होतात याची तालुकानिहाय आकडेवारी तयार करणे आदि कामे नगर पालिका व वाहतूक शाखेने तात्काळ करावीत तर राज्य परिवहन महामंडळ व उप प्रादेशिक कार्यालयामार्फत वाहतूक नियंत्रणासाठी आराखडा तयार करावा. उपप्रादेशिक कार्यालयाने अपघात प्रमाण रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिक्षा चालकांची बैठक घेऊन त्यांचे वाहतूक दर निश्चित करुन द्यावेत. ग्राहकांच्या तक्रारी असतील तर रिक्षा वाहकांसाठी एक नियमावली तयार करुन द्यावी. तसेच रस्त्यांच्या सीमा निर्धारीत करुन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
    रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी सूचनाफलक व दिशादर्शक फलक लावावेत. त्यातूनही अपघात झाल्यास अपघातस्थळी तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी नागरिकांनी 108 क्रमांकावर दुरध्वनी करावा, असेही आवाहन डॉ.नारनवरे त्यांनी या बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.
 
Top