उस्मानाबाद :- आत्मा अंतर्गत शेतक-यांच्या विविध विषयावरील शेतकरी गट निर्मिती करुन शेतकरी गटासाठी आराखडा तयार करणे व त्यासंबंधीची माहिती शेतक-यांना व्हावी यासाठी  संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
          येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात आत्मा अंतर्गत कृषि विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, आत्माचे प्रकल्प संचालक व्ही.डी.लोखंडे, प्रकल्प उपसंचालक व्ही.एम.हिरेमठ, एस.आर.चोले, सॉफ्टवेअर इंजिनअर संजय सोनवणे  यांच्यासह  विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
           यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, गाव, तालुका आणि जिल्हातील प्रत्येक शेतकऱ्यांकडून माहिती प्रपत्रानुसार संकलित केली जाणार आहे नंतर ती संगणक प्रणाली मध्ये भरण्यात येणार असून सुरुवातीच्या माहितीसाठी उस्मानाबाद व भूम या तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या माहितीमध्ये  कृषी, पशुसंवर्धन, यांच्यासह विविध विभागाची माहिती त्यांनी दिलेल्या सूचनांसह भरुन ही प्रणाली अद्यावत करण्यात येणार आहे. यामध्ये खरीप आणि रब्बी  पिकांची माहिती, फळबाग, आंबा, शेतीतील अवजारे, पशुपालकांची माहिती, शासकीय योजना विषयक माहिती, शेतकरी महिला बचत गटांची माहितीचा समावेश असणार आहे. अशा सर्व समावेशक माहिती संगणक प्रणालीमध्ये नोंद व्हावी यासाठी  विविध विभागांनी आपली माहिती विहित प्रपत्रात भरुन सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिले. 
कृषी सहायक आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्यामार्फत ही माहिती अद्यावत केली जाणार आहे.
 
Top