वैराग (महेश पन्‍हाळे) :- पंढरपूर म्‍हणून ओळखले जाणारे बार्शी तालुक्‍यातील धामणगाव येथील श्री संत माणकोजी बोधले महाराज यांच्‍या 320 व्‍या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्‍त धामणगाव येथे भक्‍तीमय वातावरणामध्‍ये पुष्‍पवृष्‍टी करण्‍यात आली. सात दिवस सुरु असलेल्‍या या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो भक्‍तांनी हजेरी लावली.
     इ.स. 1604 मध्‍ये धामणगाव (ता. बार्शी) येथे श्री संत माणकोजी बोधले या अवतारी महात्‍म्‍याचा जन्‍म झाला. त्‍यांची विठ्ठलावर निस्सिम भक्‍ती होती. त्‍यांच्‍या भक्‍तीला प्रसन्‍न होवून त्‍यावेळी पांडुरंग स्‍वतः आषाढी पौर्णिमेस श्री क्षेत्र धामणगाव येथे आले. त्‍यामुळे धामणगावाला अध्‍यात्मिकदृष्‍टया प्रचंड महत्‍त्‍व निर्माण झाले. त्‍यानंतर इ.स. 1694 साली धामणगाव येथे त्‍यांनी संजीवन  समाधी घेतली. नाथ संप्रदाय, दत्‍त संप्रदाय आणि भागवत संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम श्रीक्षेत्र धामणगाव येथे आहे.
        गेल्‍या 320 वर्षापासून धामणगाव येथे श्री माणकोजी बोधले महाराज यांच्‍या संजीवनी समाधी सोहळा साजरा होता. यावर्षी संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्‍त अखंड हरीनाम सप्‍ताह पार पडला. यावेळी प्रवचन, किर्तन, गाथा भजन यासह धार्मिक कार्यक्रम पार पडले. साेमवार रोजी श्री माणकोजी बोधले महाराज यांचे अकरावे वंशज विवेकानंद बोधले महाराज उर्फ मनूदादा यांच्‍या काल्‍याच्‍या किर्तनाने सांगता करण्‍यात आली . दरम्‍यान, दि. 15 जून रोजी ह.भ.प. प्रभाकर बोधले महाराज यांच्‍या किर्तनानंतर श्री संत माणकोजी बोधले महाराज यांच्‍या समाधीवर बोधले महाराजांचे वंशज, बोधले परिवार आणि भक्‍तगणांनी पुष्‍पवृष्‍टी केली. याप्रसंगी बोधले महाराजांचे अकरावे वंशज विवेकानंद बोधले महाराज, विजयसिंह बोधले, विठोजी बोधले, रणजितसिंह बोधले, श्रीराम बोधले, अशोक बोधले, बापूराव बोधले, ह.भ.प. जयवंत बोधले, यशवंत बोधले, मनोज बोधले, डॉ. एकनाथ बोधले, ह.भ.प. एकनाथ काकडे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
 
Top