वैराग (महेश पन्हाळे) -: बदल हा माणसाचा स्वभाव असला तरी देहामध्ये होणा-या बदलापेक्षा मनामध्ये होणारा बदल समाजासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्या आत्मस्वरुपाचा विचार होणे गरजेचे आहे, असे मत वैराग (ता. बार्शी) येथे आयोजित केलेल्या संतनाथ प्रवचन मालेच्या तिसरे पुष्प गुंफताना व्यक्त केले.
वैरागमध्ये गेल्या तीन दिवसांपासून ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांची प्रवचनमाला सुरु होती. आज शनिवार रोजी प्रवचन मालेची सांगता करताना 'मन करा रे प्रसन्न' या विषयावर प्रवचन करत अंतकरणातील मोह नष्ट होत नाही. तोपर्यंत मनप्रसन्न होत नाही, असे त्यांनी सांगितले. मनामध्ये चिंता, अशांतता, दुःख, काळजी, भय, क्रोध, मोह, मत्सर निर्माण झाले की मन विचलित होते. मग लाखो-करोडो खर्च केले तरी शांती लाभत नाही. अशावेळी उपाय ठरतो, तो फक्त संत संगत करण्याची आणि भगवंताचे नामस्मरण करण्याचा, मनाचा चंचल स्थिती कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक पहायला मिळते. हे पटवून देण्यासाठी बोधले महाराजांनी मनराजाचे उदाहरण दिले. याप्रमाणे मनराजाची दुसरी पत्नी निवृत्ती हिच्याबरोबर लग्न झाल्यावर मनाला चार मुले व चार मुली झाली. यांचे बाळंतपण सुबुध्दीने केले. चार मुलांमध्ये विवेक, वैराग्य, भाव, निजभोद यांचा समावेश आहे तर मुलींमध्ये भक्ती, शांती, क्षमा, दया यांचा समावेश आहे. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाराजांनी चिता आणि चिंता यांचे दिलेले उदाहरण मार्मिक ठरले. सजीवास जिवंतपणी जाळते ती चिंता आणि मेल्यावर मयतास जाळते ती चिता. या दोन्ही मध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे. आपल्या आजच्या वागण्यावरुन पुढची पिढी ठरत असते. त्यामुळे विचार करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून भूतकाळाचे स्मरण, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याचे चिंतन म्हणजे विचार अशी व्याख्याही त्यांनी सांगितली.
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रवचनमालेस वैराग शहरासह ग्रामीण भागातूनही श्रोते येऊ लागल्याने प्रवचनमालेच्या प्रतिसादामध्ये मोठ्याप्रमाणाने वाढ होत आहे. या प्रवचनमालेस अखिल भारतीय वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर इंगळे, वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर, ह.भ.प. रंगनाथ काकडे, यशवंत बोधले, मनाज बोधले आदीजण उपस्थित होते.