उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी परिक्षेचा निकाल मंगळवार रोजी जाहीर झाला. यात उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८४.७४ टक्के लागला आहे. उत्तीर्ण होण्यामध्ये यावर्षीही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. उत्तीर्ण होण्यामध्ये मुलांचे प्रमाण ८२.०१ टक्के तर मुलींचे प्रमाण ८७.९९ टक्के एवढे आहे.
    उस्मानाबाद जिल्ह्यातील ४०७ शाळांमधुन २० हजार ८२५ विद्याथ्र्यांनी बोर्डाकडे दहावी परिक्षेचे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २० हजार ७१५ विद्याथ्र्यांनी परिक्षा दिली. परिक्षा दिलेल्या विद्याथ्र्यांपैकी १७ हजार ५५३ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्णचे हे प्रमाण ८४.७४ टक्के आहे. उत्तीर्ण विद्याथ्र्यांमध्ये डिस्टीक्शनमध्ये ३ हजार ७१३, प्रथम श्रेणीत ६ हजार ४३९, द्वितीय श्रेणीत ५ हजार ९६२ तर फक्त पास १ हजार ४३९ अशा पद्धतीने विद्याथ्र्यांची गुणवत्ता समोर आली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.९९ टक्के तर मुलांचे ८२.०१ टक्के आहे. या दहावीच्या परिक्षेसाठी ११ हजार २८६ मुले परिक्षेला बसले होते. त्यापैकी ९ हजार २५६ मुले पास झाली. तर परिक्षेला बसलेल्या ९ हजार ४२९ मुलींपैकी ८ हजार २९७ मुली पास झाल्या आहेत.
    मंगळवार रोजी दुपारी दुपारी १ वाजता महाराष्ट्राचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परिक्षेचा निकाल इंटरनेटवर जाहीर केला. मंडळाच्या वेबसाईटवरून आपला निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्‍यांनी शहरातील जवळपास सायबर कॅफे व इंटरनेट सुविधा असलेल्या संगणक सेंटरवर गर्दी केली होती. प्रत्येकाला आपला निकाल लवकर कळावा हीच भावना होती. त्यामुळेच शहरातील सायबर कॅफे हाऊसफुल्ल झाले होते. केवळ दोन ते तीन तासात ही गर्दी निवळली. पण तोपर्यंत या सेंटरला जत्रेचे स्वरूप आले होते. चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांच्या चेह-यावर आनंद आणि समाधान व्यक्त होत होते. त्यातुनच त्यांचा उत्साह द्विगुणीत होत होता. तर कांही विद्यार्थी कमी गुण मिळाल्याने नाराजही दिसुन आले. निकाल लागल्यानंतर विद्याथ्र्यांची जागोजागी पुढील प्रवेशाची चर्चा जोरदार सुरू होती. दहावी नंतरच्या संधी कुठल्या आणि कुठे प्रवेश घ्यायचे यासंदर्भात पालक आणि विद्यार्थी आज दिवसभर तज्ञांचे सल्ले आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घेताना दिसत होते. त्यासोबतच शाळांमध्ये पास झाल्याच्या आनंदा प्रित्यर्थ गुरूजणांना पेढे देण्यासाठीही विद्याथ्र्यांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. बोर्डाची गुणपत्रिका मिळण्यास अजुन अवधी आहे. मात्र तोपर्यंत विद्याथ्र्यांनी इंटरनेटवर प्रसिद्ध झालेली गुणपत्रिकेची प्रत काढून आपले गुणही पडताळून काढले.

२५ शाळांचा १०० टक्के निकाल

यावेळी जिल्ह्यातील २५ शाळांनी निकालात प्रगती करून १०० टक्के ध्येय साध्य केले. उस्मानाबाद शहरातील विद्यामाता, ग्रिनलॅन्ड व सिटी प्राईड यात या तिन शाळांचा समावेश आहे. तर तालुक्यातील भैरवनाथ हायस्कूल धारूर, भूममधील जवाहरलाल नेहरू उर्दु शाळा भूम, कळंब तालुक्यातील संत गोरोबा काका हायस्कूल, सौंदाना अंबा, भाई नारायणराव लोमटे हायस्कूल भाटशिरपूरा, केंद्रीय अनुसूचित जाती आश्रमशाळा डिकसळ, मदर तेरेसा विद्यालय शेलगाव (दि.), लोहारा तालुक्यातील सरस्वती विद्यालय माकणी, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय हराळी, निवासी अपंग शाळा सास्तूर, उमरगा तालुक्यातील जयराम विद्यालय नारंगवाडी, जयस्वामी नारायण विद्यालय समुद्राळ, उर्दु हायस्कूल उमरगा, रायझीन सन हायस्कूल उमरगा, परंडा तालुक्यातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी विद्यालय कुंभेफळ, श्रीराम हायस्कूल पाचपिंपळा, तुळजापूर तालुक्यातील एस. पी. हायस्कूल जळकोट, पार्वती कन्या प्रशाला जळकोट, इंदिरा गांधी विद्यालय गंधोरा, ज्ञान दिप विद्यालय सलगरा, मेसाई माध्यमिक विद्यालय जवळगा (मे), मोहम्मद मुनीर उर्दु शाळा हंगरगा आणि वाशी तालुक्यातील कमळेश्वर विद्यालय पिंपळगाव (क) या शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे.
 
Top