अलिम मैनुद्दीन सय्यद
बार्शी/पांगरी -: लग्नाच्या वरातीमध्ये दारु पिऊन गोंधळ व भांडणे करणारांची भांडणे सोडिविल्याचा राग मनात धरुन युवकाचा खून करण्यात आल्याची घटना पांगरी (ता.बार्शी) येथे गुरुवार रोजी रात्री सव्‍वा नऊ वाजण्‍याच्‍या सुमारास घडली आहे. याबाबत पांगरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 
     अलिम मैनुद्दीन सय्यद (वय २५, रा.पांगरी) असे यातील दुर्देवी मृत्यू झालेल्या युवकाचे नांव आहे. संतोष उर्फ बाळा मधुकर गाढवे, रामेश्वर चंद्रकांत कुंभार असे घटनेशी संबंधीत अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  दोन्ही आरोपींना घटनेनंतर अवघ्या तीन तासातच कुसळंब जवळील कृष्णा नगर येथे पळुन जाण्‍याच्या प्रयत्नात असताना अटक केले. त्याच्यांकडुन गुन्हयात वापरलेले हत्यार हस्तगत करन्यात आले आहे. अमोल हरिश्चंद्र कुंभार (सर्वजण रा.पांगरी) यांनी याबाबत पांगरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
 
पाच दिवसांपूर्वी गावातील रामगुडे यांच्या लग्नाची वरात निघाली होती यावेळी काही डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात जण दारु पिऊन गोंधळ घालत होते. यावेळी गोंधळ करुन भांडणे करणारांची भांडणे सोडविण्यासाठी मयत सय्यद हा तरुण मध्ये येऊन भांडणे सोडविली. सदरच्या घटनेचा राग मनात धरुन पांगरी बस स्थानक चौकात गुरुवारी दि.१९ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास आरोपींनी सय्यद याच्या छातीत चाकू मारुन गंभीर जखमी केले. यामध्ये सय्यद याचा मृत्यू झाला.
    शुक्रवारी दि.२० रोजी पांगरी येथे मोठा तणाव निर्माण झाला होता. सय्यद याचे शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी मयताच्या नातेवाईकांसह गावातील मोठ्या जमावाने शहरात रास्ता रोको केला. यावेळी गावातील सुरु असलेल्या अवैध दारु, मटका, जुगार, यासह इतरही बेकायदा धंद्यांमुळे गुंडगिरी वाढत असल्याचे तसेच पोलिसांचा नाकर्तेपणा असल्यामुळेच अशा प्रकारच्या गैरकृत्यांना चालना मिळत असल्याचे अनेकांनी म्हटले. यावेळी गावातील नागरिकांमध्ये पोलिसांविरोधात संतापाची लाट व तीव्र असंतोष दिसून येत होता. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी पांगरीच्या घटनास्थळी भेट दिली. गावामध्ये तणावपूर्ण शांतता दिसून येत होती. मुस्लिम स्मशानभूमी येथे मयत सय्यद याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा पुढील तपास सहा.पो.निरीक्षक बी.डी.ओव्हाळ हे करीत आहेत.
    बार्शी तालुक्यातील मागील दिड ते दोन महिन्यातील खुनाचा हा तिसरा प्रकार असून यापूर्वी झालेल्या प्रकारात वैराग येथील वीटभट्टीचा मालक इच्चाप्पा पवार याच्यावर डोळ्यात चटणी टाकून पूर्ववैमनस्यातून निर्घूण खून करण्यात आला होता. काही दिवसांतच बार्शीतील नागेश गाढवे या युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारधार शस्त्रांनी निर्घून खून करण्यात आला. या घटनेनंतर काही दिवसांतच पांगरी येथे सदरचा खूनाचा प्रकार घडल्याने बार्शी तालुक्यातील पोलिस हे कायदा सुव्यवस्था राखण्यास कुचकामी ठरत असल्याने नागरिकांच्या मनात असंतोषाचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

      खुनाच्या घटनेच्या पार्श्‍वभुमीवर आज सकाळी नातेवार्इकांनी मृतदेह पुणे-लातुर राज्यमार्गावर ठेऊन पांगरी गावातील अवैध धंदे बंद करून आरोपींवर कठोर कारवार्इ करण्‍याची मागणी करूण दहा दिवसात गावातील बेकायदा धंदे पोलिसांनी बंद न केल्यास आंदोलन छेडण्‍याचा र्इशारा पोलिसांना दिला. पोलिसांनी कारवार्इचे आश्‍वासन दिल्यानंतर अंत्यविधी पार पडला. खुनाच्या घटनेमुळे रात्रीपासुनच स्टेट रिझर्व पोलिस, सोलापुर ग्रामिण पोलिसांच्या जादा तुकडया बंदोबस्तासाठी लावण्‍यात आल्या होत्या.
 
Top