औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी तिस-या फेरीअखेर १५ हजार मतांची आघाडी घेत पुन्हा एकदा विजय मिळविला आहे.
   मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान झाले होते. आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण व महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह एकूण २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील कलाग्रामसमोरील सभागृहात ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतपत्रिकांच्या छानणीनंतर सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये वैध ठरलेल्या ९६ मतांपैकी आ. चव्हाण यांना ४९ मते तर बोराळकर यांना ४३ मते पडली होती त्यामुळे सुरुवातीपासूनच आ. चव्हाण यांनी आघाडी घेतली होती.
    मतांचा कोटा दोन्ही उमेदवारांपैकी कोणीही गाठू न शकल्याने दुपारनंतर दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. तिस-या फेरीअखेर आ. सतीश चव्हाण यांना ७० हजार मते मिळाली होती तर महायुतीचे शिरीष बोराळकर यांना ५५ हजार मते मिळाली त्यामुळे आ. चव्हाण यांनी १५ हजार मतांनी विजय मिळविला असल्याचे जाहीर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आ. चव्हाण यांना विजयी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया सुरू होती.
    या मतदारसंघात एकूण १ लाख ४२ हजार १३६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता त्यापैकी ७० हजार मते आ. चव्हाण यांना मिळाली. ही मतमोजणी पार पाडण्यासाठी वर्ग १, २ व ३ च्या सुमारे ३०० कर्मचा-यांसह निवडणूक निरीक्षक एस. एस. यवले, निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल, आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिका-यांच्या कडेकोट बंदोबस्तात पार पाडली.
 
Top